हेल्मेटविना तुम्ही स्मार्ट दिसता.. पत्नीच्या आग्रहामुळे त्याने हेल्मेट काढलं आणि 6 गोळ्या थेट डोक्यात; असा रचला कट
'हेल्मेट घालून बाइक चालवू नका, हेल्मेटशिवाय बाईक चालवली तर तुम्ही खूप स्मार्ट दिसता.' फोनवरील पत्नीच्या या स्तुतीने तो हरखला आणि हेल्मेट काढून मित्राकडे दिलं. पण पुढल्याच क्षणाला त्याच्यासोबत जे घडलं तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पत्नीचा तो कॉल अखेरचाच ठरला.

पाटणा | 29 सप्टेंबर 2023 : अवघ्या सहा मृहिन्यांपूर्वी त्याला हळद लागली होती. धूम-धडाक्यात लग्न होऊन, वाजत-गाजत वरात घेऊन त्याने पत्नीसह गृहप्रवेश केला. आनंदात नवा संसार सुरू झाला. मुलाचं आयुष्य मार्गी लागल्याने घरचेही खुश होते. आनंदाचं वातावरण होतं. पण अवघ्या एका घटनने त्याचं हसतं-खेळतं घर क्षणात मुकं झालं. संपूर्ण घरादारावर शोककळा पसरली. असं नेमकं काय घडलं त्यांच्या घरी ?
बिहारच्या वैशालीमध्ये एका तरूणाच्या मृत्यूने संपूर्ण गावच हादरलं. गोळ्या झाडून त्याची हत्या (murder) करण्यात आली. या हत्येनंतर (crime news) आता नवनवे खुलासे होत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं. पण हे लग्न करू नकोस नाहीतर पस्तावशील, अशी धमकीच त्याला लग्नापूर्वी मिळाली होती. तरीही त्याने लग्न केलं हे पाहून लग्नानंतरही त्याला पोस्टातून चिठ्ठी आली. बायकोल सोड नाहीतर परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकी पुन्हा त्याला देण्यात आला. मात्र त्याने ऐकलंच नाही. अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार कोण आहे, हे जेव्हा पोलिसांनी सांगितलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली
जवळची व्यक्तीच मास्टरमाईंड, असा रचला हत्येचा कट
त्या तरूणाच्या पत्नीनेच त्याची हत्या घडवून आणली. तिनेच हा कट रचला असा दावा पोलिसांनी केला आहे. खरंतर, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिमपूर येथे गुरुवारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंकज सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. बिस्किट कारखान्यात कामाला असणारा पंकज घरी परत येत होता. तेव्हाच त्याला पत्नीचा फोन आला. तुम्ही हेल्मेट घालून बाईक चालवू नका, असे तिने त्याला सांगितले.
हेल्मेटशिवाय दिसता स्मार्ट
त्याच्या पत्नीने त्याला फोनवर सांगितलं की ‘ तुम्ही हेल्मेट घालून बाईक चालवू नका. हेल्मेटमुळे तुमचे केस वाऱ्यावर उडत नाहीत. तुम्ही हेल्मेट न घालता बाईक चालवता तेव्गा खूप स्मार्ट दिसता’. पत्नीच्या या प्रेमभऱ्या स्तुतीमुळे पंकज हुरळला आणि त्याने हेल्मेट काढून मागे बसलेल्या मित्राकडे सोपवलं. पत्नीशी बोलून झाल्यावर बाईक सुरू करून तो जरा पुढे गेला न गेला तोच काही आरोपींनी समोर येऊन थेट त्याच्या डोक्यात 6 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकजचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
आम्ही तुमच्या मुलाचे हितचिंतक आहोत, मुलाचा जीव वाचवा…
यापूर्वी पंकजचे लग्न ठरले तेव्हा त्याला धमकीचा फोन आला होता. लग्न केले तर जीव गमावशील अशी धमकी त्याला मिळाली. तरीही त्याचे लग्न झालेच. लग्नानंतरही त्याला पोस्टाद्वारे पत्र पाठवून पुन्हा धमकी मिळाली. पंकजचे वडील बलराम सिंह यांच्या नावाने हे पत्र आले होते, त्यात लिहिले होते- ‘बलराम भाई नमस्कार, आम्ही तुमचे शत्रू नाही तर हितचिंतक आहोत. लग्न करू नकोस, असे आम्ही तुमच्या मुलाला बजावलं होतं पण हे लग्न करून तो अडकला आहे. काही हरकत नाही, अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही अजूनही मुलाचा जीव वाचवू शकता. आम्ही तुमचे हितचिंतकच आहोत. बाकी तुमची मर्जी’ अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आले होते.
यानंतर पंकजच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी त्यावर वेळीच कारवाई केली असती तर आज आमचा मुलगा जिवंत असता, असे शोकाकुल कुटुंबियांनी सांगितले. याप्रकरणी आता पोलिसांनी मृताच्या पत्नीसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.