धुळ्यात दरोडेखोरांचा दिवसाढवळ्या सुळसुळाट, तरुणाला नव्या कोऱ्या दुचाकीवरुन उतरवलं, हत्या केली, नंतर…
एका 21 वर्षीय तरुणाने पोळा सणाचे औचित्य साधून शोरुममधून नवी बाईक विकत घेऊन घरी आणण्याचं ठरवलेलं असतं. त्यानुसार तो शोरुममध्ये जातो. तो नवी दुचाकी घेऊन तिथून घरच्या दिशेला देखील निघतो. पण तो घरी पोहोचलाच नाही.
धुळे : काही घटना इतक्या क्रूर असतात की त्या ऐकून माणूस सुन्न होतो. धुळ्यात अशीच सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने पोळा सणाचे औचित्य साधून शोरुममधून नवी बाईक विकत घेऊन घरी आणण्याचं ठरवलेलं असतं. त्यानुसार तो शोरुममध्ये जातो. तो नवी दुचाकी घेऊन तिथून घरच्या दिशेला देखील निघतो. पण तो घरी पोहोचत नाही. कारण वाटेत काही क्रूर चोर त्याची वाट अडवतात. ते त्याला दुचाकीतून खाली उतरवतात. त्याची अमानुषपणे हत्या करुन दुचाकी घेऊन पोबारा होतात. दिवसाढवळ्या अशाप्रकारे तरुणाची खून जाल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
पैशांची जुळवाजुळ करुन दुचाकी घेतली, पण
मृतक 21 वर्षीय तरुणाचं नाव प्रेमसिंग गिरासे असं आहे. प्रेमसिंग हा घरातील एकुलता एक कर्ता तरुण होता. त्याची गेल्या अनेक दिवसांपासून स्वत:ची हक्काची दुचाकी असावी, अशी इच्छा होती. अखेर पोळा सणाचे औचित्य साधून त्याने पैशांची जुळवाजुळव करत दुचाकी घेतली. पण ती दुचाकी घेऊन तो घराच्या दाराशी देखील पोहोचू शकला नाही. घरी येत असताना अज्ञात चोरांनी त्याला अडवत त्याची हत्या केली. त्यानंतर त्याची दुचाकी पळवून नेली. प्रेमसिंग याच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको
प्रेमसिंग गिराचे याच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. प्रेमसिंगचा खून करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्या यासाठी ग्रामस्थांनी थेट रास्ता रोको आंदोलन केलं. संबंधित घटना ही दिवसाढवळ्या घडल्याने ग्रानस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चोर, दरोडेखोरांचे धाडस इतके वाढले आहे की ते चोरीसाठी माणसाचा जीव देखील घेण्यासाठी मागेपुढे बघत नाहीयत. त्यांना पोलिसांचाही धाक राहिलेला नाही. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळेच संबंधित घटना घडली, अशा विचाराने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
प्रेमसिंगच्या नातेवाईकांचा चिमठाणे फाट्याजवळ रास्ता रोको
प्रेमसिंगच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी चिमठाणे फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान संबंधित घटनेची माहिती कळताच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थ आणि मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हते. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी ते करत होते.
पुण्यात तरुणाची हत्या
दरम्यान, पुण्याच्या चाकण येथेही एका तरुणाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृतक हा सोळा वर्षांचा आहे. तो बिहारचा रहिवासी आहे. तो बऱ्याच दिवसांपासून चाकणमध्ये राहत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड टाकून हत्या केली, असं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच पोलिसांनी संबंधित परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार काही संशयितांची माहिती मिळाली आहे. त्याचबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :
डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?
नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले; अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू