Ulhasnagar Crime : वाढदिवसाच्या पार्टीतच हत्या, दारूमुळे ‘बर्थ डे बॉय’ला मित्रांनीच संपवलं!
वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाले आणि बर्थ डे बॉयला त्याच्या मित्रांनीच संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाले आणि बर्थ डे बॉयला त्याच्या मित्रांनीच संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. उल्हासनगरच्या चिंचपाडा येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र चौकशीनंतर या हत्येचा उलग़ा झाला. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक वायाळ असे मृत तरूणाचे नाव असून तो अवघ्या २३ वर्षांचा होता. . तर निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कार्तिक २७ जूनला वाढदिवस होता. मात्र त्याच रात्री त्याचा अचानक मृत्यू झाला. इमारतीच्या खाली तो मृतावस्थेत पडलेला आढळला. वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत पार्टी गेलेल्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने वायाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. वाढदिवसाच्या दिशीच, तरण्या ताठ्या मुलाचा मृत्यूची बातमी समजल्याने त्यांच्या कुटुंबियाना मोठा धक्का बसला. पार्टीत दारूवरून वाद झाले. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. निलेश जखमी झाल्याने आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो. परत आल्यावर कार्तिक इमारतीच्या खाली कोसळलेला दिसला, असा दावा तिघा मित्रांनी केला होता. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
असा उघडकीस आला गुन्हा
मात्र कार्तिकच्या वडिलांना हा खुलासा पटला नव्हता. आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला नाही, त्यात काही काळबेरं आहे असे सांगत कार्तिकच्या वडिलांनी तिघां मित्रांवर संशय व्यक्त केला. अखेर पोलिसांनी तिघाही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून कठोरपणे चौकशी केल्यावर तिघांचेही अवसान गळाले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
का केली हत्या ?
निलेश, सागर आणि धीरज यांनी गुन्हा कबूल केला. मात्र त्यांनी असं का केलं हे पोलिसांनी विचारल्यावर त्यांनी जे कारण सांगितलं ते ऐकून सगळेच हबकले. कार्तिक वायाळ हा चिंचपाड परिसरात राहणार असून २७ जूनला वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने, निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव या तिघांना पार्टी देण्याचे ठरवले. प्रथम एका ठिकाणी सेलिब्रेशन झाल्यावर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत त्यांची पार्टी सुरू राहिली. मात्र दारूची नशा चढल्यावर पार्टीत दारूवरून वाद झाले. त्यावेळी कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली, तो जखमी झाला.
मात्र निलेशला मारल्यामुळे तो आणि इतर मित्र संतापले. आणि त्या तिघांनी कार्तिकला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यामुळे कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता मित्रांकडूनच कार्तिकची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. त्या तिघांनाही अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.