Ganpat Gaikwad Firing | आमदाराच्या गोळीबारानं ठाणे जिल्हा हादरला, कल्याण बंद… तणाव, दंगल नियंत्रक पथक तैनात
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर, महेश गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 3 फेब्रुवारी 2024 : शुक्रवारी रात्री कल्याण-डोंबिवलीत परिसरात मोठा राजकीय राडा झाला. चक्क पोलिस ठाण्यातच झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरलं. भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर, महेश गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.
कल्याण बंदची हाक
तणावाचं वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं घर तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी कल्याण पूर्व परिसरात बंदची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून माजी नगरसेवक, कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलं आहे. उल्हासनगरच नव्हे तर कल्याणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेत दुकाने बंद
महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणपत गायकवाडांसह 5 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान या गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या हल्ल्या प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडलाही यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आरोपींवर हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल आहे.
महेश गायकवाडांवर ठाण्यात उपचार सुरू
दरम्यान या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यावर त्यांना उपचारांसाठी ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. याची माहिती मिळताच खासदार श्रीकांत शिंदे रात्रीच हॉस्पिटलमध्ये आले आणि ते रात्रभर हॉस्पिटलमध्येच मुक्काम ठोकून बसले होते. ते सतत डॉक्टरांकडे महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करत होते.
का झाला हल्ला, काय आहे प्रकरण ?
ज्यांनी हा गोळीबार केला ते गणपत गायकवाड आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. तसं असलं तरी त्यांच्यात सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. याच शीतयुद्धाचा मोठा फुगा उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात फुटला. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाला. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राउंड फायर करण्यात आल्या.