नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमधील नोएडा येथील स्पेक्ट्रम मॉलमध्ये सर्विस चार्ज (service charge) म्हणजेच सेवा शुल्कावरून एका कुटुंबाला मारहाण (family beaten) करण्यात आली. मॉलच्या बाऊन्सर्सनी कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस तपासात गुंतले आहेत. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या वतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
खरं तर, गेल्या रविवारी एक कुटुंब स्पेक्ट्रम मॉलमधील ड्युटी फ्री रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टीनंतर सर्व्हिस चार्जवरून कुटुंबीयांचा रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांशी वाद झाला. यादरम्यान वादावादी इतकी वाढली की रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी मॉलच्या बाऊन्सरना बोलावले.
बिलातून सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिल्याने वाद वाढला
बाऊन्सर्सनी कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की त्यांनी रेस्टॉरंटच्या बिलातून सर्व्हिस चार्ज काढून टाकण्याची विनंती केली होती, परंतु कर्मचार्यांनी तसे करण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांच्यात वादावादी आणि मारामारी झाली.
Fight erupted between customers and staff in Noida’s Spectrum mall after restaurant levied ₹970 service charges
— Rishi Bagree (@rishibagree) June 19, 2023
दोन्ही पक्षांनी नोंदवली तक्रार
या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनीही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे. हे कुटुंब स्पेक्ट्रम मॉलमधील ड्युटी फ्री रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होते. पार्टीनंतर सर्व्हिस चार्ज देण्यावरून हॉटेल मालक आणि कुटुंबिया या दोन्ही पक्षांत वादावादी व हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
महिन्याभरापूर्वी घडली होती अशीच घटना
नोएडाच्या मॉल्समध्ये गार्ड आणि बाऊन्सर आणि ग्राहक यांच्यादरम्यान मारामारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या (मे) महिन्यात लॉजिक्स मॉलमध्ये एका तरुणाला तीन सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली होती, त्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला होता.
काडेपेटी नेण्यास नकार दिल्याने झाला होता वाद
खरंतर हा तरुण मॉलमध्ये जात असताना तपासणीदरम्यान त्याच्या खिशात काडेपेटी किंवा माचिस आढळली. नियमानुसार मॉलच्या आत माचिस अथवा इतर ज्वलनशील वस्तू नेता येत नाहीत. मात्र तो तरुण काडेपेटी नेण्यावर ठाम होता. रक्षकांनी त्याला खूप समजावले, पण त्याने काहीच ऐकलं नाही आणि रक्षकांशी भांडू लागला. त्यावर सुरक्षारक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली.