अल्पवयीन अत्याचार प्रकरण, बृजभूषण शरणसिंह यांना दिल्ली पोलिसांकडून क्लीन चीट
सध्या महिला पहिलवान अत्याचार प्रकरण आणि अल्पवयीन अत्याचार प्रकरण देशभरात गाजत आहे. अल्पवयीन अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरणसिंह यांना दिलासा दिला आहे.
दिल्ली : अल्पवयीन अत्याचार प्रकरणात बृजभूषण शरणसिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.सात महिला पहिलवानांनी दिल्ली पोलिसांकडे बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका अल्पवयीन मुलीने बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर सहा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या महिला पहिलवानांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पैकी अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी बृजभूषण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.
पोलिसांकडून 550 पानांचा क्लोजर रिपोर्ट सादर
दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीच्या दोन न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं आहे. सहा महिला पहिलवानांनी दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात दिल्लीच्या रॉउज एवन्यू न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला न्यायालयात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारी संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 550 पानांचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 4 जुलैला होणार आहे.
महिला पहिलवान प्रकरणी 22 जून रोजी सुनावणी
तर सहा महिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 22 जून रोजी दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयात दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आरोपी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 354, 354 ए, 354 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा आरोपी विनोद तोमर याच्या विरोधात कलम 109/354/354ए/506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.