फरीदाबाद : हल्ली कुणाला कोणत्या कारणातून राग येईल आणि कोण काय करेल याचा नेम नाही. हल्लीची पिढी छोट्या-छोट्या कारणावरुन गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना हरयाणातील फरिदाबादमध्ये घडली आहे. मोठ्या बहिणीने लहान भावाला मोबाईल ठेवून अभ्यास करण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या भावाने बहिणीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रियांशू असे आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.
आई-वडिल दोघे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. घरात बहिण-भाऊ एकटेच होते. आई-वडिल घरी आले तेव्हा मुलगी मृतावस्थेत पडली होती, तर मुलगा घरातून गायब होता. वडिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला.
पोलिसांनी घरातून गायब झालेल्या तरुणाचा शोध सुरु करत त्याला ताब्यात घेतले. यानंतर तरुणाकडे सखोल चौकशी केली असता तरुणाने सर्व हकीकत सांगितली. बहिण मोबाईल पाहण्यास मनाई करत होती आणि सतत अभ्यास करण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळे तरुण कंटाळला होता आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. तरुणाच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस सुनावण्यात आली आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.