त्या एका चुकीमुळे पकडला गेला, विशालची बायको भडाभडा बोलली; कल्याणला हादरवणारं हत्याकांड कसं घडलं?
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, बलात्कार आणि हत्येच्या घटनेत पती-पत्नीसह एका रिक्षाचालकाची अटक करण्यात आली आहे. पत्नीने पतीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांना रक्ताचे डाग सापडल्याने संशय निर्माण झाला आणि तपासात सत्य उघड झाले. पत्नीला कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
गुन्हेगार कितीही सराईत असो किंवा अट्टल असो, पण गुन्ह्याला वाचा फुटतेच. विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आपल्या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून त्याने त्या मुलीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला त्याच्या बायको आणि मित्रानेही साथ दिली. पण आपली बायकोच आपला भांडाफोड करेल हे त्याला कुठे माहीत होतं? संशयावरून पोलिसांनी आज दोन्ही नवराबायकोला अटक केली. त्यानंतर पोलिसांचा इंगा पडताच विशालची बायको साक्षी भडाभडा बोलली. तिने गुन्हा कसा झाला? विशालने काय काय केलं? याची कबुलीच दिली. विशालने एक चूक केली आणि तो कसा पकडला गेला हेही दिसून आलं.
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी गवळी आणि रिक्षाचालकाला अटक केली. रिक्षा चालकाला कालच अटक केली होती. तर साक्षीची काल राहत्या घरातून अटक करण्यात आली होती आणि विशालच्या आज बुलढाण्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. साक्षीला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिला कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
संध्याकाळी 7 वाजता चक्र फिरले
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर साक्षीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रमच पोलिसांना सांगितला. विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घरी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्नविछिन्न मृतदेह ठेवला होता. त्यानंतर साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली. साक्षी एका खासगी बँकेत नोकरीला आहे. साक्षी आली तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला. हा प्रकार ऐकून ती हैराण झाली होती, असं साक्षीने म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विचार केला, मित्राला बोलावलं
त्यानंतर दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याचा विचार केला. त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्या आधी दोघांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले. रात्री 8.30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावून घेतली. 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञातस्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं.
रक्त सापडलं अन्…
बापगाववरून परत येत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली. त्यानंतर तिथून तो बुलढाण्याला निघून गेला. साक्षी कल्याणमध्येच राहिली. इथपर्यंत सर्व ठिक होतं. पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे पोलिसांना हे कृत्य विशालनेच केल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने या खूनाची सर्व माहिती पोलिसांना दिली.