नाशिकः नाशिकमधील बिल्डर बाळासाहेब कोल्हे याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हे याला यापूर्वी भूमाफियाप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी फसवणूक प्रकरणी कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. यात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे याच्यासह भूमाफिया टोळीचा प्रमुख रम्मी राजपूत, त्याचा भाऊ आणि इतर 20 जणांना मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीला पैसा पुरवण्याचे काम बाळासाहेब कोल्हे करायचा. विशेष म्हणजे शहरातील बहुचर्चित रमेश मंडलिक खून प्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे त्याला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हे तुरुंगात असताना भूसंपादन विभागाचे अव्वल कारकून राहुल काळे यांनी एक तक्रार दिली होती. याप्रकरणी कोल्हेविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासनाची केली फसवणूक
बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे याने खोटे दस्ताऐवज तयार केले. त्याने रमेश मंडलिक कुटुंबाची फसवणूक केली आणि शासनाची फसवणूक केली, हे आता समोर आले आहे. या गुन्हाचा तपास पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी केला. तेव्हा त्यांना कोल्हेविरोधात पुरावा मिळाला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे मंडलिक खून प्रकरण?
नाशिकमधील बहुचर्चित अशा आनंदवल्ली भागात झालेल्या वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक यांचा जमिनीसाठी खून झाला होता. या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सूत्रधार भूमाफिया रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूतला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी रम्मी राजपूतसह बिल्डर बाळासाहेब कोल्हे, सचिन त्र्यंबक मंडिलकसह वीस जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. नाशिकमधल्या आनंदवल्लीमध्ये रमेश मंडलिक यांचा भूमाफियांनी सुपारी देऊन खून केला. त्यांची 30 लाख रुपये आणि 10 गुंठे जमिनीची सुपारी होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले याला दिली होती.मंडलिक हे पाच फेब्रुवारी रोजी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता.
हे आहेत आरोपी
मंडलिक खून प्रकरणातील आरोपींमध्ये सचिन मंडलिक, अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैरे, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहे बारकू कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, अनिल वराडे, जगदीश त्र्यंबक मंडलिक, रम्मी परमजितसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी आदींचा समावेश आहे. या भूमाफिया टोळीसोबत इतर अनेकांचे संबंध उघडकीस आले आहेत.