“आधी आपण चोराला शोधू नंतर आम्ही…”, पीडित महिलेची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता, तिथं ऑन ड्युटी असलेल्या पोलिस अंमलदाराने दिलेल्या उत्तरामुळे बुलढाणा जिल्ह्यात वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे
गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या (Gold chain stolen) घटना उघडकीस आल्या आहेत. बुलढाणा शहरात एक असा प्रकार घडला आहे की, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. पीडीत महिलेने हा सगळा प्रकार पोलिस अधिक्षकांच्या (Superintendent of Police) कानावर घातल्यामुळे झालेला प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सोन साखळी चोरांवर बुलढाणा पोलीस मेहेरबान ? अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. हे प्रकरण पोलिस अधिक्षकांनी गांभीर्याने घेतलं असून पोलिस अंमलदारावरती कारवाई होण्याची शक्यता आहे.
सोनसाखळी चोरांना पकडून न्याय देण्याची मागणी
पीडित महिला तक्रार देण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसात गेली होती, त्यावेळी महिलेला तेथील ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केला असल्याचं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय “आपण आधी चोर शोधू त्यानंतर तक्रार घेतो , असे म्हटले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्याभरात बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामधील एकाही सोनसाखळी चोरीच्या घटनेचा छडा पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे बुलढाणा पोलीसच या सोनसाखळी चोरांना अभय देतात की काय ? असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यात उपस्थित केला जातोय. या प्रकाराविरोधात बुलढाणा येथील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची तक्रार केली आहे आणि चौकशी करून तात्काळ सोनसाखळी चोरांना पकडून न्याय देण्याची मागणी केली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासूव बुलढाणा जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु त्यापैकी एकाही चोराला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. त्याचबरोबर तक्रार देण्यासाठी महिलेला भयानक उत्तर दिल्यामुळे पोलिसांचं चोरट्यांना अभय आहे का? अशा पद्धतीची चर्चा सुरु झाली आहे.