गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सातत्याने अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (malkapur) तालुक्यात चिखली रनथम (chikhali rantham) येथे दुचाकी घसरून दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारासाठी नेताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा मृत्यू मार्ग बनत चालला असल्याची चर्चा सुरु आहे. मुंबई नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र काम सुरू असताना या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. मात्र असे असताना सुद्धा ठिकठिकाणी फलक न लावणे, रस्त्यावर थेट वाहतुकीसाठी स्लोप नसणे, यासह विविध कारणे या अपघातांचे कारण ठरत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरती काम सुरु आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात अपघात सुरु आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत अनेकांचे बळी सुद्धा गेले आहेत अशी माहिती तिथले स्थानिक देत आहेत. रस्त्याचं काम जी कंपनी करीत आहे, त्याचं कंपनीने लोकांना पर्यायी रस्ता देणं गरजेचं असताना सुद्धा पर्यायी रस्ता अजून दिलेला नाही. त्यामुळे अपघात होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
काल एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात लोकांनी हळहळ व्यक्त केली. रस्त्याचं काम सुरु होतं, त्याच ठिकाणी मोटारसायकल घसरली. झालेल्या मृत्यूला कंत्राट घेतलेली कंपनी जबाबदार असल्याची सुद्धा लोकं चर्चा करीत होती. तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.