बुलढाणा – आधी मैत्री झाली त्याचं रुपांतर प्रेमात झालं, सात जन्मसोबत राहण्याच्या नव्हे, तर सोबत जीवन मरणाच्या आनाभाका घेत जातीय व्यवस्थेला तिलांजली देत दोघांनी त्या लग्न ही केलं आहे. काही वर्षे सुखी संसाराची फळे चाखणाऱ्या या दाम्पत्यांनी (Couple) एका मुलीला जन्म देखील दिला आहे. 31 जुलै रोजी विवाहितेने गळफास घेत जगाचां निरोप घेतल्याची धक्कादायक घटना मलकापूर पांग्रा (Malkapur Pangra) येथे घडली आहे. स्वतःच्या 10 वर्षीय मुलीला ही विषारी औषध पाजल्याची शंका आहे. या तान्हुलीवर मेहकर येथील रुग्णालयात (Mehkar Hospital) उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील निलेश वरकड हा युवक सुरत येथे कामाला होता. दरम्यान, त्याची तेथील दिपाली नामक तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीने मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालेय. मुलीच्या घरच्या लोकांचा विरोध असतानाही दोन वर्षांपूर्वी दोघांनीही आंतरजातीय प्रेम विवाह केलाय. त्यानंतर दोघेही मलकापूर पांग्रा येथे राहण्यास आले होते. सुखी संसाराची फळे चाखत असताना निलेश आणि दिपालीला मुलगी झाली. सध्या निलेश आणि दिपाली शेतातील घरात वास्तव्यास होते. दरम्यान, काल 31 जुलै रोजी दुपारी दिपालीने आपल्या 10 महिन्यांच्या गौरीला विषारी औषध पाजले असल्याची शंका असून त्यानंतर स्वतः गळफास घेत आपली जिवनयात्रा संपविली.
मुलगी गौरीला अत्यावस्थ स्थितीत मेहकर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र दिपालीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.