क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला, एकाने दुसऱ्यावर थेट…
क्रिकेट खेळण्यावरुन दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. वादातून एकाने दुसऱ्याची बॅट तोडली आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
बुलढाणा / संदीप वानखेडे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन अल्पवयीन मुलांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून एका मुलाने दुसऱ्या मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगरमध्ये घडली. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत मुलाला बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
किक्रेटची बॅट तोडल्यावरुन वाद
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर येथे राहणारा पीडित अल्पवयीन मुलगा हा आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळत होता. यावेळी दुसरा एक अल्पवयीन मुलगा तेथे आला आणि त्याने त्याची बॅट तोडली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी मुलाने तोडलेल्या बॅटचे पैसे देखील पीडिताला दिले. मात्र दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून आरोपीने पीडितेच्या पोटात चाकूच खुपसला.
उपचारादरम्यान जखमी मुलाचा मृत्यू
यानंतर जखमी मुलाला तात्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पोटात घाव मोठा असल्याने त्याला बुलढाणा येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात दाखल होत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पीडित मुलाच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.