गणेश सोळंकी, बुलढाणा : मोबाईलचे पैसे मागितल्याच्या कारणातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पळून चालल होता. मात्र सिनेस्टाईलने पाठलाग करत आरोपीला डोणगाव पोलिसांनी अटक केली आहे. मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे ही घटना घडली. मोबाईलच्या पैशावरुन दोघात वाद झाला, या वादाचे हाणामारीत रुपांतर होऊन हत्येची घटना घडली. जगन्नाथ प्रल्हाद नवले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अंकुश प्रकाश इयाटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
नागेशवाडी गावाच्या बाजूला असलेल्या कांदा चाळीत आरोपी जगन्नाथ प्रल्हाद नवले हा इतर साथीदारांसोबत दारु पित बसला होता. यावेळी अंकुश इयाटे हा तेथे आला. मयत अंकुशने काही दिवसांपूर्वी त्याच्याकडील मोबाईल आरोपी जगन्नाथ नवले याला विकला होता. याचे पैसे मागण्यासाठी अंकुश आला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्लील शिवीगाळ देत आरोपी जगन्नाथने अंकुशवर हल्ला करत त्याला जखमी केले.
दोघांचे भांडण सुरु असताना तेथे उपस्थित अन्य मद्यपी घाबरून पळून गेले. मारहाणीत अंकुशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने अंकुशचा मृतदेह नाल्यात फेकला आणि तो पळून गेला. घटनेची माहिती मिळताच अंकुशचे वडील प्रकाश इयाटे यांनी डोणगाव पोलिसात तक्रार दाखल केली. मयताच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत घटनेचा तपास सुरु केला.
सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश अपसुंदे यांनी तांत्रिक बाबीवरून आरोपीचा माग काढला. आरोपी हा घाटबोरी, मेहकर, डोणगाव मार्गे फरार होत असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना कळले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत सिनेस्टाईलने पाठलाग करुन ट्रकमधून आरोपीला पकडले.