Burari Mass Suicide | 11 वर्ष 11 डायऱ्या, कुटुंबातील 11 जणांची आत्महत्या, 30 जून 2018 च्या काळरात्री बुरारीत काय घडलं होतं?
बुरारी मृत्यूकांड ही सामूहिक आत्महत्या मानली जाते. 11 पैकी 10 सदस्य घरात गोलाकार पद्धतीने फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. यामध्ये दोन पुरुष, सहा महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा समावेश होता. सर्वांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती, तर तोंडाला पट्टी लावली होती
मुंबई : मध्य प्रदेशातील जोशी कुटुंबाने अवघ्या काही दिवसांपूर्वी सामूहिक आत्महत्या (Bhopal Family Mass Suicide) केली. त्यावेळी सुरुवातीला हे सामूहिक आत्महत्या प्रकरण बुरारीतील 11 जणांच्या कुटुंबाच्या सुसाईड केसप्रमाणे (2018 Burari Deaths in Delhi)असल्याची चर्चा रंगली होती. राजधानी दिल्लीतील बुरारीमध्ये राहणाऱ्या चुंडावत कुटुंबात (Chundawat) 30 जून 2018 च्या काळरात्री नेमकं काय काय घडलं, हे सांगायला कोणीही वाचलं नाही. कारण आजी, मुलं, सुना, नात-नाती असे एकाच कुटुंबातील तब्बल 11 जण 1 जुलैच्या सकाळी मृतावस्थेत आढळले होते. दहा जण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते, तर आजीचा गळा आवळण्यात आला होता. या कुटुंबाने आत्महत्या केली का, त्याची नेमकी कारणं काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
काय आहे प्रकरण?
चुंडावत कुटुंबातील मोठा मुलगा ललित मॉर्निंग वॉकला दिसला नाही, तेव्हा शेजारी राहणाऱ्या गुरुचरण सिंह यांना थोडंसं आश्चर्य वाटलं. चुंडावत कुटुंब जवळच एक दुकान चालवत होते. मात्र उशिरापर्यंत ते दुकानही उघडलं नसल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सगळे जण कुठे बाहेर गेले की काय, या विचाराने ते त्यांच्या घराकडे निघाले. दरवाजा उघडाच होता. गुरुचरण सिंह आत शिरले, आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण जिथे पाहावं तिथे चुंडावत कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह लटकलेले दिसत होते.
लहान-मोठे असे सर्वच जण छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गुरुचरण सिंह यांना चक्कर येणं बाकी होतं. ते कसंबसं स्वतःला सावरत घराबाहेर पडले आणि त्यांनी इतर शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. एक जुलै 2018 च्या सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
गोलाकार पद्धतीने फासावर लटकले
बुरारी मृत्यूकांड ही सामूहिक आत्महत्या मानली जाते. 11 पैकी 10 सदस्य घरात गोलाकार पद्धतीने फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. यामध्ये दोन पुरुष, सहा महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा समावेश होता. सर्वांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती, तर तोंडाला पट्टी लावली होती. काही जणांचे हात आणि पायही बांधलेले होते. तर अकराव्या सदस्य म्हणजे 77 वर्षीय आजी नारायणी देवी दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा तपास सुरु केला. सायकॉसिस डिसऑर्डर (common psychosis disorder) हे या आत्महत्या प्रकरणाचे कारण असू शकते, असा अंदाज या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी लावला होता. एका गुप्त प्रथा-परंपरेचं पालन करताना हा प्रकार घडल्याचा त्यांचा अंदाज होता.
11 वर्ष लिहिल्या 11 डायऱ्या
एका हसत्या-खेळत्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याची घटना सर्वांना संशयास्पद वाटत होती. त्यामुळे वेगवेगळ्या बाजूंनी या घटनेचा तपास सुरु झाला. 11 वर्ष लिहिल्या गेलेल्या 11 डायऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये हात आणि पाय कसे बांधावेत, यासह अनेक अंधश्रद्धांचा उल्लेख होता. या डायऱ्या देवघराजवळ आढळल्या होत्या. डायरीमधील मजकुराप्रमाणेच कुटुंबीयांचे मृतदेह घरात गोलाकार पद्धतीने लटकलेले सापडले होते.
कुटुंबातील सदस्या प्रियांका आणि नीतू या स्टूल आणि वायर घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या होत्या. या वस्तू आत्महत्येसाठी वापरण्यात आल्या होत्या. डायरी, मोबाईल फोन आणि आयपॅड फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. डायरीतील हस्ताक्षर घरातील दोन महिलांचे असल्याचं स्पष्ट झाल्याने हे सामूहिक हत्याकांड नसून आत्महत्याच असल्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
संबंधित बातम्या :
वादानंतर पोटच्या पोराचं डोकं हातोड्याने फोडलं, मुंबईत 52 वर्षीय आईला अटक