कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्नॅक्स सेंटरमध्ये घुसली गाडी, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
खटाव तालुक्यातील विनायक कुलकर्णी हे 45 वर्षीय इसम आपल्या ताब्यातील व्हॅगनर कारने शुक्रवारी साताऱ्याला कामानिमित्त गेले होते. काम आटोपून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून खटाव येथील आपल्या गावी चालले होते.
सातारा / संतोष नलावडे (प्रतिनिधी) : साताऱ्याहून रहिमतपूरच्या दिशेने निघालेल्या व्हॅगनार कारमधील चालकाचा ताबा सुटल्याने स्नॅक्स सेंटरमध्ये गाडी घुसल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावानजीक रानमळा स्नॅक्स सेंटरमध्ये गाडी घुसली. या अपघातात गाडीसह स्नॅक्स सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनायक कुलकर्णी असे जखमी कार चालकाचे नाव आहे. या सर्व अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
साताऱ्याहून काम आटोपून घरी जात असताना अपघात
खटाव तालुक्यातील विनायक कुलकर्णी हे 45 वर्षीय इसम आपल्या ताब्यातील व्हॅगनर कारने शुक्रवारी साताऱ्याला कामानिमित्त गेले होते. काम आटोपून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून खटाव येथील आपल्या गावी चालले होते. यादरम्यान धामणेर गावातील एस वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या स्नॅक सेंटरमध्ये घुसली.
अपघातात दुकान आणि गाडीचे नुकसान, कारचालक जखमी
या अपघातात स्नॅक सेंटरच्या भिंतीला तडे गेले असून, पत्र्याच्या शेडचे देखील नुकसान झाले आहे. तसेच गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यात कार चालक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सातारा शहरातील यशवंत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात अद्याप अपघाताची नोंद करण्यात आली नाही.