Video : काळ आला होता पण…, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार नदीत पडली, दोघे सुखरुप
समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कलाप्पाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार बेळगाव-वेंगुर्ला रोडवर असलेल्या हांजहोळ नदीजवळील पुलावरुन नदीत कोसळली.
कोल्हापूर : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण (Control) सुटल्याने कार (Car) नदीत पडल्याची घटना बेळगाव-वेंगुर्ला रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावर 5 च्या सुमारास ही घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोघेही सुखरूप (Safe) बचावले. कल्लाप्पा बाणेकर (35), रेश्मा बाणेकर (30) अशी कारमधील दोघांची नावे आहेत. दोघे मुरकुटेवाडी येथील रहिवासी आहेत. सुदैवाने दोघेही वाचले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ नदीत उडी घेत जोडप्याला वाचवले.
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले
कल्लाप्पा व त्याची पत्नी रेश्मा हे दोघेही यशवंनगर (ता. चंदगड) कडून मारुती सुझुकी कंपनीची सेलेरो कार घेऊन आपल्या गावी मुरकुटेवाडीकडे येत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कलाप्पाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार बेळगाव-वेंगुर्ला रोडवर असलेल्या हांजहोळ नदीजवळील पुलावरुन नदीत कोसळली. याचवेळी तेथे उपस्थित तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव व बेळगाव येथील दोन पर्यटक यांनी ही घटना पाहिली. त्यांनी क्षणाचीही विचार न करता नदीत उतरुन कारमधील दाम्पत्याला बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली. कल्लाप्पा हा शिनोळी येथील कंपनीत नोकरीस आहे. त्या कंपनीतील त्याच्या सहकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संगम पाटील व बिर्जे यांनी मोठे धाडस करत वाहून जाणारी कार दोरीने झाडाला बांधली. त्यानंतर कार नदीतून काढण्याचा प्रयत्न झाला. पण पाऊस व चिखलामुळे यश आले नाही. (Car falls into river while trying to rescue biker in Kolhapur, both safe)