पिस्तूल एकच मात्र गोळीबार डबल, देवळाली गावातील घटनेप्रकरणी माजी नगरसेवक, इतरांवरही गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ
नाशिकच्या देवळाली गावात शिंदे आणि ठाकरे गटात झालेल्या वाद अधिकच टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूने गुन्हा दाखल झाल्याने पोलीसांच्या तपासाकडे लक्ष लागून आहे.
नाशिक : गेल्या आठवड्यात नाशिकच्या देवळाली गावात शिवजयंतीच्या बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मागील वर्षाच्या शिवजयंतीचा हिशोब विचारल्यानंतर दोन गटात मोठा राडा झाला होता. याचवेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याने गोळीबार केला होता. त्यावरून तक्रारदाराच्या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील स्वप्नील लवटे यांच्यासह पिस्तूलही उपनगर पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर ज्या स्वप्नील लवटेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या वडिलांनी समोरच्या गटानेही गोळीबार केल्याची तक्रार उपनगर पोलिसांत दिली होती. त्यावरून दूसराही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी नगरसेवकासह दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी नगरसेवक अस्लम ऊर्फ भय्या मणियार आणि सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव, सागर कोकणे यांचा नावाचा समावेश आहे.
देवळाली गावात शिवजयंतीच्या बैठकीत झालेल्या राड्यावर आत्तापर्यन्त पोलीसांनी दोन गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये एक पिस्तूल आणि माजी नगरसेवकाच्या मुलाला अटकही केली आहे.
दोन्ही गटाकडून तक्रारी देण्यात आल्या असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शिवजयंतीच्या बैठकीला उपस्थतीत असलेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असून एकच पिस्तूल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या या राड्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
शिंदे गटाची स्वतंत्र शिवजयंती साजरी केली जाईल पण त्यास सर्वपक्षीय म्हणू नका असे बोलून दोन्ही गटात वाद झाला यामध्ये गोळीबार झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
तर गुन्ह्यातील काही आरोपी फरार आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलीस दलातील पथके त्यांच्या मागावर असून मुंबई नाका पोलीसांच्या पथकाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
दरम्यान शिदे आणि ठाकरे गटात झालेला हा राडा अधिकच टोकाला गेला आहे. दोन्ही कडून आरोप केले जात असतांना पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.