चंद्रपुरात गुन्हेगारी फोफावली, थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा जीव घेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी हा तोंडाला दुपट्टा बांधून आला होता. त्याने योग्य संधी साधत जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर गोळी झाडली.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बतमी समोर येतेय. चंद्रपुरात अराजकतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. अज्ञात आरोपीने संतोष रावत यांच्यावर गोळी झाडली. पण सुदैवाने रावत हे या हल्ल्यात बचावले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी हा तोंडाला दुपट्टा बांधून आला होता. त्याने योग्य संधी साधत जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर गोळी झाडली. मात्र या हल्ल्यातून सुदैवाने संतोष रावत बचावले आहेत. त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारने आल्याची आणि त्यातील एका आरोपीने गोळी झाडल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी संतोष रावत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलं. तर दुसरीकडे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी हे फरार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे पोलिसांपुढील ध्येय आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
रावत यांचे समर्थक आक्रमक
दरम्यान, या हल्ल्यामागे काही राजकीय कारण आहे का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण मूल बाजार समितीच्या सभापतीची उद्या निवड होणार आहे. संतोष रावत यांच्याकडे 18 पैकी 18 सदस्यांचं बहुमत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडीचा आणि हल्ल्याच्या घटनेचा काही संबंध तर नाही ना? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
दुसरीकडे हल्ल्याच्या घटनेनंतर संतोष रावत यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी मूल-चंद्रपूर रस्ता जाम केलाय. संतोष रावत हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या प्रकरणाला जास्त गांभीर्याने घेणं आवश्यक असल्याचं मत मांडलं जात आहे.