‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ प्रकरण, फेक वेबसाईट प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल, वाचा सविस्तर
चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता 2021 प्रकरणी तपास सुरु केला आहे. Pradhanmantri Berojgar Bhatta scheme
चंद्रपूर:प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना नावाने वेबसाईट तयार करून फसवणुकीचा प्रकार होत असल्याची बाब समोर आली होती. चंद्रपूर पोलिसांनी इंटरनेटवरील बनावट वेबसाईट विरोधात प्रकरण दाखल केले आहे. पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने याविषयी तपास सुरु केला आहे. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करुन नोंदणी केली जात होती. वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर बेरोजगारांना अडीच ते साडे तीन हजार रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुन पसरवली जात होती. बेरोजगार भत्ता संबंधी वेबसाईट बंद करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी गुगलला अधिकृत ई मेल केला आहे. (Chandrapur Police file case against website of Pradhanmantri Berojgar Bhatta scheme)
व्हायरल होणारा मेसेज नेमका काय?
सोशल मीडियावर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. यात देशातील 10 वी पास असलेल्या सर्व बेरोजगारांना दरमहिन्याला 3 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आधीच अडचणीत आलेले अनेक लोक या मेसेजमधील वेबसाईटवर जाऊन आपली खासगी माहिती भरत आहेत. व्हाटसअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा मेसेज अनेक ग्रुपमध्ये शेअर केला जात होता.
व्हायरल मेसेजची सत्यता
दावा:- एक मैसेज में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार बेरोजगारों को प्रति माह ₹3800 तक का बेरोजगारी भत्ता प्रदान कर रही है।#PIBFactCheck:- यह दावा फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/CwedA2UKRB
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 27, 2021
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (PIB) या व्हायरल पोस्टची दखल घेत केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच व्हायरल होत असलेला मेसेज खोटा (Fake Message) असल्याचं सांगितलं.
व्हायरल पोस्टचे बळी ठरल्यास काय नुकसान?
संबंधित व्हायरल मेसेजमध्ये सायबर गुन्हेगार लोकांना आपली खासगी/व्यक्तिगत माहिती देण्यास सांगतात. यात अगदी तुमच्या बँक खात्याचाही समावेश आहे. नागरिकांकडून बँकेच्या तपशीलासह इतर सर्व माहिती गोळा केल्यानंतर हे गुन्हेगार थेट बँक खात्यातील पैसे गायब करण्याचं काम करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजला बळी न पडणं हेच हिताचं आहे.
जबाबदार नागरिकांनी काय करावं?
जबाबदार नागरिकांनी सरकारी योजनांची सत्यता तपासल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नये. तसेच आपल्या संपर्कातील लोकांनाही जागृक करावं. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेली माहिती आली की पुढे फॉरवर्ड करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट आपण स्वतः खातरजमा केल्याशिवाय इतरांना पाठवू नये. अन्यथा तुम्ही स्वतः तर या फसवणुकीचे बळी ठरलाच पण तुमच्या जवळच्या इतर लोकांनाही या संकटात टाकाल. म्हणूनच सावध राहा, सतर्क राहा. सरकारी वेबसाईटच्या शेवटी gov.in किंवा nic.in असं लिहिलेलं असते ते नसेल तर संबंधित वेबसाईट फेक आहे असं समजावं.
संबंधित बातम्या:
‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ अंतर्गत 3500 रुपये मिळणार? वाचा व्हायरल पोस्टचं सत्य
(Chandrapur Police file case against website of Pradhanmantri Berojgar Bhatta scheme)