श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण, आफताब पुनावालाविरोधात आरोप निश्चितीचा फैसला होणार, दिल्ली कोर्ट काय निर्णय देणार?
देशातील बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. यामुळे आज दिल्ली कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबत दिल्ली कोर्टात आज महत्वपूर्ण फैसला होणार आहे. आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावालाविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीतील न्यायालय आज आपला आदेश जाहीर करणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी 15 एप्रिल रोजी फिर्यादी वकिलांकडून आरोप निश्चित करण्याबाबत युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. पूनावाला याच्यावर दिल्ली पोलिसांनी आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
श्रद्धाच्या वडिलांच्या मागणीवर उद्या उत्तर दाखल होणार
श्रद्धाचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी ताब्यात देण्यात यावे, यासाठी श्रद्धाच्या वडिलांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दिल्ली पोलीस उद्या उत्तर दाखल करणार आहेत. श्रद्धाच्या वडिलांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी तपास यंत्रणेने 15 एप्रिलला वेळ मागितला होता. न्यायालयाने तपास यंत्रणेची विनंती मान्य करत आपली बाजू मांडण्यासाठी मुदत दिली होती.
गेल्या वर्षी मे महिन्यात झाली होती श्रद्धाची हत्या
दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारी रोजी 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले. गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या राहत्या घरी जवळजवळ तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. पकडले जाऊन नये म्हणून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले होते. हे हत्याकांड उघड होताच देशात एकच खळबळ माजली होती.