डेटिंग अॅपद्वारे मैत्री, तरुणाचा विश्वास संपादन केला; मग गुंतवणुकीच्या नावाखाली दीड कोटी लाटले
सुरुवातीला तरुणाने लाख रुपये टाकले, त्याचे डबल पैसे परत मिळाले. असे अनेक वेळा करत त्या महिलेने तरुणाचा विश्वास संपादन केला.
नवी मुंबई : डेटिंग अॅपवर मैत्री झालेल्या मैत्रिणीने तरुणाला तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना नवी मुंबईतील खारघरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित तरुणाला पैसे डबल करुन देण्याचे आमिष दाखवत फिलीपाईन्समधील महिलेने त्याची फसवणूक केली.
डेटिंग अॅपवर फिलीपाईन्सच्या महिलेशी ओळख
खारघर परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपद्वारे त्याची मैत्री फिलिपाईन्स देशातील एका महिलेशी झाली.
सुरवातीला डबल पैसे देऊन विश्वास संपादन केला
काही दिवसांनी या महिलेने आपण तुला क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास डबल पैसे मिळतील असे सांगितले. सुरुवातीला तरुणाने लाख रुपये टाकले, त्याचे डबल पैसे परत मिळाले. असे अनेक वेळा करत त्या महिलेने तरुणाचा विश्वास संपादन केला.
यानंतर महिलेने त्याला एक कोटी रुपये टाकण्यास सांगत, त्याचे दोन कोटी मिळतील असे सांगितले. त्याने एक कोटींची गुंतवणूक केली. त्याचे डबल मिळाले नाही म्हणून तिने त्याला अजून काही पैसे टाकावे लागतील असे सांगितल्यावर त्याने अजून 60 लाखांची गुंतवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाची पोलिसात धाव
पैसे डबल झाले असल्याचे तिने सांगितल्यावर त्याने तात्काळ बँक गाठली. मात्र तुमच्या खात्यात काहीच जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्याला संशय आल्याने महिलेला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद आल्याने त्याचा संशय आणखीनच बळावला.
आरोपी महिलेला ताब्यात घेणे पोलिसांसमोर आव्हान
तरुणाने सायबर सेलला फोन करून माहिती घेतली असता त्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तरुणाने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र परदेशी महिला आणि तिने दिलेले परदेशी अकाऊंट त्यामुळे सदर महिलेला ताब्यात घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.