10 वर्षांनी बाळ झालं, बारसं आटोपून निघतानाचा काळाचा घाला ! मद्यधुंद तरूणांच्या कारची धडक, चौघेही…
दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं आटोपून निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्या तरूणांच्या कारने जोरदार धडक दिली. त्यामध्ये आई-बाळासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आयुष्य हे अतिशय क्षणभंगूर आहे. सध्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक भीषण अपघात घडल्याने शहर हादरलं आहे. तब्बल 10 वर्षानंतर झालेल्या बाळाच बारसं आटोपून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन ड्राईव्ह करणाऱ्या तरूणांच्या कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनचा हा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोघा तरूणांना अटकही करण्यात आली आहे.
बारसं आटोपून परत निघाले आणि काळाने घातली झडप
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना घडत आहेत. पुण्यातील पोर्श कार अपघात, वरळीत पहाटे महिलेला उडवल्याची घटना किंवा गेल्याच आठवड्यात नागपूरमध्ये झालेला अपघात, एकामागोमाग एक असे अपघात घडतच आहेत. त्याचदरम्यान छ. संभाजीनगरमध्येही ड्रंक अँड ड्राईव्हचा हा थरारक अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त देसरकर कुटुंब हे पुण्याला जात असताना दारू पिऊन स्कॉर्पिओ ड्राईव्ह करणाऱ्या दोन तरूणांनी त्यांच्या कारला धडक दिली . संभाजीनगरपासून जवळच असलेल्या नगर रोडवर हा अपघात घडला. देसरकर कुटुंब हे 10 वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं आटोपून पुण्याच्या दिशेने निघाले होते, तेव्हाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघात चौघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना दारू पिऊन गाडी भरधाव चालवत धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातास कारणीभूत ठरलेले विशाल चव्हाण ( वय 22) आणि कृष्णा केरे ( वय 19) या दोन तरूणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना बेड्याही ठोकल्या आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.