बांधकाम सुरु असलेल्या घरात दगडांखाली महिलेचा मृतदेह, 15 दिवसांपूर्वी हत्येचा संशय
अंबिकापूरच्या जनपद रोडवर ज्या बांधकाम सुरु असलेल्या घरामध्ये महिलेचा मृतदेह दगडाखाली सापडला आहे, ते घर प्रशांत त्रिपाठी यांचे आहे. नव्याने बांधलेल्या घरातील नाल्यात दगडांखाली पुरलेला महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे.
रांची : छत्तीसगडमधील (Chhattisgarh Crime News) अंबिकापूर येथे बांधकाम सुरु असलेल्या घरात महिलेचा मृतदेह (Dead Body) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह इमारतीखाली असलेल्या नाल्यात पुरुन दगड टाकण्यात आले होते. अंदाजे 15 दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
अंबिकापूरच्या जनपद रोडवर ज्या बांधकाम सुरु असलेल्या घरामध्ये महिलेचा मृतदेह दगडाखाली सापडला आहे, ते घर प्रशांत त्रिपाठी यांचे आहे. नव्याने बांधलेल्या घरातील नाल्यात दगडांखाली पुरलेला महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे.
काय आहे प्रकरण?
आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, हा मृतदेह या ठिकाणी मजुरीचे काम करणाऱ्या महिलेचा असू शकतो, कारण काही दिवसांपूर्वीच या घरात बांधकाम सुरु होते. त्यावेळी येथे मजूर कामाला होते. त्याच वेळी घर मालकाने लग्न समारंभ आयोजित केल्याने घराचे बांधकाम बंद करण्यात आले होते.
पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच या खुनाचा उलगडा होणार असल्याची चर्चा आहे. अंबिकापूरचे प्रभारी सीएसपी अखिलेश कौशीश यांनी सांगितले की, रविवारी सकाळी जनपद पंचायत रोडवर असलेल्या प्रशांत त्रिपाठी यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
मृतदेह सुमारे 15 दिवसांपूर्वीचा
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुमारे 15 दिवसांपूर्वीचा आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या मृतदेहाचे गूढ लवकरच उकलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.