दारुसाठी रक्ताचे नातेही विसरला, पिण्यास मनाई केली म्हणून जन्मदात्यालाच…
मुलगा रोज दारु पिऊन यायचा आणि घरात भांडण करायचा. बापाने मुलाला दारु पिऊ नको असे समजावले. मात्र मुलाला या गोष्टीचा राग आला. मग मुलाने जे केले त्यानंतर सर्वच हादरले.
राजनांदगाव : दारु पिण्यास मनाई केली म्हणून मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा काटा काढल्याची घटना छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात घडली. दुखू राम असे 61 वर्षीय पित्याचे नाव आहे. दारु पिण्यास मनाई केली म्हणून बाप-लेकात जोरदार वाद झाला. त्यानंतर मुलाने मंदिरातील त्रिशुल छातीत खुपसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत घटनेचा तपास सुरु केला. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. खेमलाल वर्मा असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मुलाला दारुचे व्यसन जडले होते
खेमलाल हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मजुरीचे काम करतो. सध्या तो सुट्टी घेऊन आपल्या गावी गेला होता. खेमलालला दारुचे व्यसन जडले होते. नाशिकहून आल्यानंतर तो दररोज दारु पिऊन घरी यायचा. त्याच्या दारुच्या व्यसनामुळे घरात अनेकदा वाद होत होते. रविवारी रात्री दुखू राम गावातील शितला देवी मंदिराजवळ बसले होते. यावेळी खेमलाल दारुच्या नशेत तेथे आला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला.
दारु पिऊ नको सांगितले म्हणून बापाला संपवले
यानंतर दुखू राम दारु पिऊ नको अशी समजूत मुलाची काढू लागले. मात्र मुलाला या गोष्टीचा राग आला. तो धावत मंदिरात गेला आणि त्रिशुल घेऊन येत वडिलांच्या छातीत खुपसला. यात दुखू राम यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करत, मृतदेह ताब्यात घेतला.