लग्नातील असा राडा तुम्ही पहिलाच नसेल, मानपान नाही तर गुलाबजामवरुन तुंबळ हाणामारी, असं काय होतं गुलाबजाममध्ये?
लग्न म्हटले की थोडंफार रुसणं-फुगणं या गोष्टी आल्याच. पण पुण्यातील एका लग्नात विचित्रच घटना उघडकीस आली आहे. असा राडा तुम्ही कधी पाहिला नसेल की ऐकला नसेल.
पुणे : पुण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नात मानपानावरुन, देण्या-घेण्यावरुन वाद होतात हे आपण ऐकले असेल. पण गुलाबजामवरुन नातेवाईक भिडल्याचे ऐकले आहे का?. पण हे खरे आहे. पुणेकर काय करतील याचा नेम नाही. चक्क गुलाबजामवरुन भरमंडपात राडा झाल्याची घटना पुण्यात उघटकीस आली आहे. कॅटरर्स आणि लग्नातील पाहुण्यांमध्ये हा राडा झाला. गुलाब जामुनला घरी नेण्यावरून हे भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात 23 एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी व्यवस्थापक दिपांशू गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शेवाळेवाडीतील राजमंगल कार्यालयात घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 23 एप्रिल रोजी शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे कुटुंबीयांचा विवाह सोहळा होता. संजय लोखंडे यांनी हॉल बुक केला होता. दुपारी दीड वाजता विवाह सोहळा सुरू झाला. यानंतर पाहुण्यांसाठी भोजन समारंभ पार पडला. भोजन समारंभ आटोपून अनेक नातेवाईक घरी परतले होते.
नातेवाईकांना गुलाबजाम घेऊन जाण्यास रोखले असता वाद
यादरम्यान एक नातेवाईक किती जोवण शिल्लक राहिले हे पहायला गेला. यावेळी कॅटरर्सने मंडपातील पाहुण्यांना उरलेले जेवण घरी घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर काही नातेवाईकांनी डब्यात गुलाबजाम भरायला सुरुवात केली. कॅटरर्सकडून गुलाबजाम घेण्यास रोखण्यात आले. दुसऱ्या लग्नासाठी बनवलेले हे गुलाबजाम असल्याचे कॅटरर्सने नातेवाईकांना सांगितले.
यावरून वाद सुरू झाला आणि हळूहळू हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. नातेवाईकांनी मिळून व्यवस्थापक दिपांशू गुप्ता यांना बेदम मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी व्यवस्थापक दिपांशू गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुप्ता यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.