कोल्हापूर : क्षुल्लक कारणातून एका सोसायटीत दोन कुटुंब एकमेकांना भिडल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेत पोवार कुटुंबीयांकडून मेहता कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. राजारामपुरी येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही हाणामारीची घटना घडली. या घटनेत महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोवार कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी संजय पोवार त्यांची पत्नी विद्या पोवार आणि मुलगा अर्जुन पोवार यांच्यासह 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजारामपुरीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये एकमेकांना बघण्यावरून वाद झाला आणि वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी पोवार आणि मेहता कुटुंबीयांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोवार कुटुंबीयांकडून मेहता कुटुंबातील आई आणि दोन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. शेफाली मेहता, केनील मेहता, तनिष मेहता अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. संजय पोवार हा छत्रपती संभाजीराजे यांचा कार्यकर्ता असल्याचा महिलेचा दावा आहे. संजय पोवार हा जिल्हा नियोजन समितीचा सदस्यही आहे. संजय पोवार यांच्याकडून जीवितास धोका असल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणी मेहता कुटुंबीयांनी केली आहे.