निवडणुकीच्या वादातून दोन गटात राडा, घटना सीसीटीव्हीत कैद
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार जिंकल्यानंतर दोन गटात कुरबुरी सुरु होत्या. काल सायंकाळी या कुरबुरीचे भांडणात रुपांतर झाले. यानंतर दोन्ही गटाने अंतिम टोक गाठले.
बीड / महेंद्र मुधोळकर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बीडच्या माळसजवळा गावात घडली आहे. दोन्ही गट तलवार आणि दांडे घेऊन एकमेकांवर धावले, यावेळी तुंबळ हाणामारी झाल्याचे पहावयास मिळाले. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत तीन जण जखमी आहेत. जखमींवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. माळस जवळा हे गाव शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे आहे. हाणामारीत दोन्ही गटातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांचा पोलीस जवाब होणार आहे, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली आहे.
दोन गटांचे समर्थक आपसात भिडले
काल सायंकाळपासून गावात दोन गटात कुरबुर सुरू होती. यातून दोन गट आमनेसामने आले. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि गावातील माऊली खांडे या दोघांचेही समर्थक आपसांत भिडले. यात बऱ्याच जणांकडे तलावर आणि काठ्या दिसून आल्या. काही क्षणातच प्रचंड हाणामारी झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीवरून वाद
शिंदे गटाचे कुंडलिक खांडे आणि गावातीलच माऊली खांडे यांचे पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत आमनेसामने होते. माऊली खांडे यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे कुंडलिक खांडे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. माळसजवळा ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गड राखत माऊली खांडे यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर या दोन्ही गटात सतत विवाद होत गेले.
शिंदे गटावर गंभीर आरोप
राज्यात सध्या शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. यामुळे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे दहशत माजवत असल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे. कुंडलिक खांडे हे हाणामारी करत असताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने आता त्यांच्यावर रितसर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.