औरंगाबादः औरंगाबादमधील क्रीडा संकुलात कोचला एका व्यक्तीने चपलेने मारहाण केलाची घटना घडली असून, यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमधील सूतगिरणी परिसरातील क्रीडा संकुलात शहरातील शेकडो विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात. रोज सकाळी आणि सायंकाळी संकुलाचे वातावरण गजबजलेले असते. आता कोरोनानंतर पुन्हा एकदा विद्यार्थी क्रीडा प्रशिक्षणासाठी हजेरी लावत आहेत. त्यात एका खेळाडूच्या वडिलांनीच कोचला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर मुरमे असे या कोचचे नाव आहे. त्यांच्या आणि प्रशांत साठे या विद्यार्थ्यांच्या वडिलांमध्ये प्रवेश पासच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करण्यापर्यंत रूपांतर झाले. यावेळी संतापलेल्या प्रशांत साठे यांनी मुरमे यांना चप्पल फेकून मारली. शिवाय पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. त्यामुळे परिसरातील वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांना हा सारा प्रकार नवीन होता. त्यामुळे त्यांच्यातही भीतीचे वातावरण आहे. या मारहाण प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रीडा संकुलाबाबत अनेक तक्रारी
औरंगाबादमधील गारखेडा परिसरात सूतगिरणी चौकात कोट्यवधी रुपये खर्च करून या भव्य क्रीडांगणाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, येथे सुविधांची देखभाल योग्य नसते. प्रवेश फी जास्त ठेवण्यात आली आहे. क्रींडागण वेळेवर उघडले जात नाही, अशा पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. यावरून येथे नेहमीच वाद होतात. त्यात हा वाद विकोपाला जावून चक्क मारहाण रंगली.
हॉटेलमध्येदोन गटांत धुमश्चक्री
औरंगाबादमधील कॅनॉट परिसरातील एका हॉटेलमध्ये कांदा वाढण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेली की, चक्क दोन गटांमध्ये धुमश्चक्री रंगली. त्यामुळे दोन हॉटेल कर्मचाऱ्यांसह सात ते आठ जण जखमी झाले. खरे तर हा वाद हॉटेलमध्ये मिटला होता. मात्र, हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर वादाने गंभीर रूप धारण केले. दोन गटांमध्ये रस्त्यावरच हाणामारी सुरू झाली. त्यात हॉटेलमधील कर्मचारी सहभागी झाले. इतर तरुणही धावत आले. त्यामुळे मोठी गर्दी झाली. रस्त्यावर एकमेकांना अक्षरशः पाठलाग करून हाणामारी सुरू होती. सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच हाणामारी करणारे तरुण पांगले. कॅनॉट परिसरात सायंकाळी तरुणांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या टोळक्यांचा या भागात वावर असतो. त्यामुळे हाणामारीचे प्रकार वाढल्याचे समजते.
इतर बातम्याः