नवी मुंबई : नवी मुंबई शहरासह मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसेसची नेहमीच वर्दळ असलेल्या वाशी बस स्थानकावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळ चारच्या सुमारास ही घटना घडली असून मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या वडिलांसोबत कथन केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोचले आहे. विद्यार्थिनी (Student)च्या तक्रारीच्या आधारे पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी नराधमाला लवकरच गजाआड करण्यात यश मिळवू, असा विश्वास नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीचे वय साधारण 40 वर्षांच्या आसपासचे आहे. तो नवी मुंबई परिसरातीलच रहिवासी असल्याचा संशय असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या साहाय्याने पोलिस अधिक तपास करीत आहे. सायंकाळी नोकरदार मंडळी घरी परतत असताना वर्दळ सुरु होती. त्यावेळी घडलेल्या या प्रकाराने तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाशी येथील नवरत्न हॉटेलसमोर बस स्टॉप आहे. या बस स्टॉपवर तक्रारदार 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरात जाण्यासाठी आपल्या बसची वाट बघत होती. याचदरम्याने तिच्या शेजारी उभा असलेल्या साधारण चाळीशीतील पुरुषाच्या हालचालींबाबत तिला संशय आला. तिने त्याच्याकडे नजर वळवली असता तो पुरुष तिच्याकडे पाहून अश्लिल कृत्य करताना आढळला. त्यावर तरुणीने संतापून त्याला विचारणा केली. तेव्हा त्या नराधमाने वेळीच सावध होत अश्लिल चाळे थांबवले आणि तेथून काढता पाय घेतला. याचदरम्यान तरुणीने त्या पुरुषाला धडा शिकवण्याच्या हेतूने त्याचे कृत्य मोबाईलवर रेकॉर्ड केले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी तत्काळ वाशी पोलिस ठाणे गाठले आणि रितसर तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाशी पोलिसांनी देखील तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
आरोपी हा वाशी किंवा आसपासच्या परिसरातील रहिवासी असल्याचा संशय आहे. विद्यार्थीनीकडील मोबाईल रेकॉर्ड आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने अश्लिल चाळे करण्याचा प्रकार मधेच थांबवून भले बस स्थानकावरून काढता पाय घेतला असेल, पण भविष्यात तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो. इतर निष्पाप मुलींना किंवा असहाय महिलांना टार्गेट करू शकतो. त्यामुळे त्याला कायद्याने जरब बसलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया तक्रारदार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. (College student molested at bus stop in Vashi; accused absconding)