मुंबई : एखाद्या हॉलीवूडच्या थरारक चित्रपटात शोभावी अशी कहानी त्याच्या आयुष्यात घडली आहे. त्याने त्याचा मागचा सगळा भूतकाळ पुसून टाकला, नवीन आधारकार्ड, नवीन नाव धारण करून मस्तपैकी छान आयुष्य तो जगू लागला. त्याने लग्न केले पुन्हा नवा संसार थाटला. आता त्याला इतका आत्मविश्वास आला की कोणीच आपले काही वाकडे करु शकणार नाही. आणि मित्रांच्या पार्टीत दारु पिताना नको ते बोलून बसला आणि त्याचा खेळ संपला…
अरे आपण काही कमी कांड केलेले नाहीत, मला काय लल्लू पल्लू समजू नको असे मित्रांमध्ये शेखी मिरवताना त्याने म्हटले आणि तीस वर्षांपूर्वीच्या केलेल्या एका गुन्ह्यांची कबूली त्याने मित्रांपुढे केली. त्यानंतर त्याला तुरुंगातच खडी फोडायला जावे लागले. कारण त्याचा भूतकाळच त्याला तुरुंगात घेऊन गेला. गेली 30 वर्षे तो पोलीसांना गुंगारा देत होता. ऑक्टोबर 1993 मध्ये अविनाश पवार याने लोणावळा येथे एका 50 ते 55 वर्षीय दाम्पत्याची अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने घरफोडी करताना निर्घृण हत्या केली होती. हे दाम्पत्याच्या त्याच्या चांगल्या परीचयाचे होते. त्यामुळे घरात सहज शिरकाव करीत त्याने हे हत्याकांड घडविले होते.
या प्रकरणात दोघा जणांना अटक झाली परंतू त्यावेळी 19 वर्षांचा असलेला अविनाश पवार तेथून दिल्लीला पसार झाला. त्यानंतर अविनाश संभाजीनगरात गेला, तेथे अमित पवार नावाने ड्रायव्हींग लायसन्स बनविले. त्यानंतर विक्रोळीला त्याने बस्तान बसवले. त्यापूर्वी पिंपरी-चिंचवड आणि नगर शहरात त्याने काही वर्षे घालविले. त्यानंतर अविनाश पवार याने अमित पवार नावाने आधारकार्ड बनवून लग्न केले आणि आपल्या पत्नीसाठी राजकीय करीयर देखील निवडले.
हत्याकांडाला तीस वर्षे झाल्यानंतर अविनाश ऊर्फ अमित आता 49 वर्षांचा झाला. त्यानंतर लोणावळा येथे 1993 नंतर तो कधीही गेला नाही. एवढेच काय आपली आई – वडील किंवा सासू- सासरे यांना कधीच भेटायला गेला नाही. त्याला वाटले आता कोणी आपले वाकडे करु शकत नसल्याच्या आत्मविश्वासात त्याने दारुच्या नशेत मित्रांना लोणावळ्याच्या दरोड्यातून केलेल्या डबल मर्डरची कहानी सांगितली. ती गोष्ट एका खबरीने एन्काऊंटर स्पेशालिस्ट वरिष्ठ पोलीस इन्सपेक्टर दया नायक यांना सांगितले आणि पवार याला शुक्रवारी विक्रोळीतून उचलण्यात आले.