बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळला होता तरुण, जीवन संपवण्याच्या विचारात होता पण…
कोरोना काळात वडिलांच्या उपचाराकरीता आणि दैनंदिन गरजांकरीता त्याने विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे हफ्ते आणि दैनंदिन खर्च भागवू शकत नसल्याने तो नैराश्येत होता.
मुंबई / कृष्णा सोनारवाडकर (प्रतिनिधी) : बेरोजगार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवण्याच्या विचारात असलेल्या तरुणाला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करुन करिअरमध्ये अपयश येत असल्याने मी आत्महत्या करत आहे. मला अवयवदान करायचे आहे, असे सांगितले. हे ट्विट पाहिल्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, पोलीस सहआयुक्त यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 5, 3, 9 आणि सायबर सेल ठाणे यांचे संयुक्त पथक तयार केले. यानंतर तांत्रिक विश्लेषण करत माहिती गोळा करत तरुणाला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे होता नैराश्येत
तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता, तो 12 वी सायन्स पास असून कामाच्या शोधात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच कोरोना काळात वडिलांच्या उपचाराकरीता आणि दैनंदिन गरजांकरीता त्याने विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे हफ्ते आणि दैनंदिन खर्च भागवू शकत नसल्याने तो नैराश्येत होता.
आत्महत्येपूर्वी ट्विट केले
याच नैराश्येतून तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. मरण्यापूर्वी त्याला आपले अवयव गरजू लोकांना दान करायचे होते, म्हणून त्याने I am committing suicide. Before that I want to donate my organs. I had decided as a child that I will donate my body before death. The reason for suicide is continuous failure in career असे ट्विट केले.
ट्विटमुळे पोलिसांना माहिती मिळाली
या ट्विटमुळे पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचे समुपदेशन केले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करत त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल तरुणाच्या आईवडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या नेतृत्वात मागच्या चार दिवसात दोन तरुणांना अशा प्रकारे आत्महत्या करण्यापासून वाचवण्यात गुन्हे यश आलंय.
गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, म पो से शहापुरकर, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, अभिजित शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, अमोल माळी, पोलीस उपनिरीक्षक कुरेशी यांच्यासह पथकातील इतर सदस्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केलीय.