सांगली, दिनांक 13 जुलै 2023 : सांगलीत फसवणुकीच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. मिरजेतील अॅक्सिस बँक फसवणूक प्रकरण ताजे असतानाच आता आयसीआयसीआय बँकेत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बँकेतील कर्मचारीच ग्राहकांना गंडा घालत असल्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. मिरजेतील आयसीआयसीआय बँकेतील सेल्स अधिकाऱ्यानेच ग्राहकांना 35 ते 40 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. ग्राहकांचे पैसे लुटल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. भरत कोळी असे फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिरज, कुपवाड आणि विश्रामबाग येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. भरत कोळी हा आयसीआयसीआय बँकेच्या मिरज कुपवाड आणि विश्रामभाग या तिन्ही शाखेतील क्रेडिट कार्ड विभागात सेल्स अधिकारी म्हणून काम करत होता. ग्राहकांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून क्रेडिट कार्डचे बिलाचे पैसे घ्यायचा. मात्र ते पैसे बँकेत न भरता स्वतःकडे ठेवायचा. अशा प्रकारे 15 ते 20 ग्राहकांची 35 ते 40 लाखाची त्याने फसवणूक केली.
ग्राहकांनी बँकेकडे तक्रार दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर भरत कोळी फरार झाला आहे. तक्रारीची दखल घेत आयसीआयसीआय बँकेच्या मुंबईतील मुख्य शाखेचे फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन अधिकारी चौकशीसाठी मिरजमध्ये दाखल झाले आहेत. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात कोळी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये ग्रामसेविकेचाही समावेश आहे. पोलीस कोळीचा शोध घेत आहेत.