आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांकडून अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
आयपीएलवर सट्टा सुरु होता. पोलिसांना या सट्ट्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर छापेमारी करत सट्टेबाजांचा डाव उधळून लावला.
पुणे / प्रदीप कापसे : आयपीएलवरती सट्टा लावणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजस्थान रॉयल आणि लखनौ सुपरजायंट या सामन्यावर आरोपींना सट्टा लावला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपींना अटक केली. राजवीनसिंग यांगा आणि मस्कीनसिंग अरोरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणारे आणि खेळवणारे यांचे धाबे दणाणले आहेत.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंटवर लावला होता सट्टा
सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत. बुधवारी 19 एप्रिल 2023 रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट या संघामध्ये सवाई मानसिंग स्टेडिअम जयपूर या ठिकाणी क्रिकेटचा सामना होता. सदर सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. त्यानुसार सखोल माहिती घेतली. यावेळी मुंबईतील दोन सट्टेबाज हे लोणावळा परिसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत येऊन एका बंगल्यात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याची बातमी मिळाली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून छापेमारी
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लोणावळ्यातील बंगाली गावातील निसर्ग बंगलो सोसायटीतील एका बंगल्यावर छापा टाकला. यावेळी दोन तरुण तेथे सट्टा लावताना आढळून आले. दोघेही मुंबईतील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सट्टा खेळण्यासाठी वापरलेले सात मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकूण दिड लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश पट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (भापोसे) लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरोधक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई प्रदीप चौधरी, सफी. प्रकाश वाघमारे, पोहवा महेश बनकर, पोहवा रामदास बाबर, मपोना रिया राणे, चापोकों अक्षय सुपे यांनी केली.