Crime News : काय आहे स्क्रॅच कार्ड घोटाळा : महिलेला तब्बल 18 लाखांचा गंडा, तुम्ही देखील व्हा सर्तक, बचावासाठी हे नियम पाळा
दिवसेंदिवस ऑनलाईन फ्रॉडची संख्या वाढत आहे. मोबाईलवरुन ऑनलाईन व्यवहार करताना सावधान राहण्याची गरज आहे. एखाद्या अनोळखी लिंकवरुन तुम्हाला लॉटरी लागली किंवा ऑफर आली तर ती लिंक अजिबात उघडू नका. हे तुमच्यासाठी सायबर गुन्हेगारांनी टाकलेले जाळे असू शकते
सध्या सर्वसामान्यांना ऑनलाईन फ्रॉड करुन फसविले जात आहे. आता फसवणूक करणाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा आणि फुकटात काही मिळत असेल तर त्यासा भुलण्याच्या मानवी स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांची पिळवणूक सुरु केली आहे. नवीन स्क्रॅच कार्ड घोटाळ्यात महिलेला 18 लाखांना फसविल्याची माहीती उघडकीस आली आहे. बंगलुरु येथील एका महिलेला आमिष दाखवून तिला स्क्रॅच कार्ड पाठविण्यात आले. या महिलेला बक्षिसाचे आमीष दाखवून रक्कम मिळण्यासाठी तिच्या टप्प्या टप्प्याने सायबर लुटारुंनी तब्बल 18 लाख लुबाडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर क्राईमचे गुन्ह्यांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांना लुटण्यासाठी सायबर क्राईम करणारे नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करीत आहेत. स्क्रॅच कार्ड आपले नशिब आजमाविण्याचा एक आनंददायी खेळ असू शकतो. परंतू सायबर क्राईम करणारे या स्क्रॅच कार्डचा वापर साध्या भोळ्या लोकांच्या संगणक अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडण्यासाठी करीत आहेत. बंगळुरु येथील एका 45 वर्षीय महिलेला नवीन पद्धतीने स्क्रॅच कार्डच्या आमिषाच्या जाळ्यात अडकविण्यात आले. महिलांना कथितरित्या ऑनलाईन रिटेलर मेसकडून एक स्क्रॅच कार्ड मिळाले होते. कार्ड सोबत एक संपर्क माहीती सोबत एक चिट्टी लिहीली होती. हे कार्ड स्क्रॅच केल्यावर तिला 15.51 लाख ती जिंकल्याचा संदेश आत असल्याने तिला अत्यानंद झाला. सूचनेनुसार तिने बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी त्यात दिलेल्या टेलिफोन क्रमांकावर फोन केला. त्यावेळी पलिकडून तिच्याकडून ओळखपत्र कागदपत्रे मागण्यात आली. त्यानंतर तिला लॉटरीतील विजेत्या रक्कमेतील केवळ 4 टक्के रक्कमच मिळणार असे सांगण्यात आले. तसेच उर्वरित रक्कम मिळण्यासाठी 30 टक्के कर भरावा लागणार असे सांगण्यात आले. कारण अशा प्रकारची लॉटरी, तसेच भाग्यशाली ड्रा अनधिकृत असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर आवश्यक कागदोपत्री कारवाई करण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. ही रक्कम 18 लाखापर्यंत गेल्यानंतर तिला कळले की आपण फसविले गेलो आहे.
आमीषापासून दूर राहावे
1 – स्क्रॅच कार्ड आपल्याला खरेदीवर अचानक दिले जातात किंवा ईमेलवरुन पाठविले जातात. त्यांचा स्वीकार करु नका. असे अनोळखी ईमेल डिलिट करु टाका
2 – अधिकृत लॉटरी आणि प्रमोशनमध्ये भाग घेण्यासाठी किंवा तुम्हाला पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कोणतीही रक्कम भरण्याची नसते
3 – जर तुम्हाला अशा प्रकारच्या स्क्रॅच कार्डच्या सत्यतेबाबत काही संशय आहे. तर तुम्ही निर्मात्याला प्रश्न विचारु शकता आणि माहीती मिळवू शकता
4 – स्क्रॅच कार्डची बक्षिसाची रक्कम प्राप्त करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहीती, तुमच्या बॅंक खाते क्रमांक, ओटीपी क्रमांक, आधार क्रमांक, डेबिट कार्ड नंबर आणि इतर खाजगी माहीती देऊ नका
5 – तुम्हाला कळलेल्या कोणत्याही स्क्रॅच कार्ड घोटाळ्याची तक्रार लागलीच पोलिसांकडे करा