महिलेचा थेट अमेरिकेतून फोन, तक्रार ऐकून पोलीस ही चक्रावले !
अमृतसर येथील एका इसमाची ग्रेटर नोएडात एका जोडप्याशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्या व्यक्तीने आपल्या आजाराविषयी जोडप्याला माहिती दिली. पण त्यांना हिच चूक महागात पडली.
ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तंत्रमंत्राच्या बहाण्याने एका व्यक्तीला करोडोचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या महिलेसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तांत्रिकांनी रुग्णाला तब्बल एक वर्ष डांबून ठेवले. तसेच आजार बरा करण्याच्या बहाण्याने तब्बल 2.75 कोटी रुपये उकळले. संजय शर्मा असे पीडित व्यक्तीचे नाव असून, ते पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी आहेत.
क्लबमध्ये आरोपींशी ओळख झाली
संजय शर्मा यांची ग्रेटर नोएडातील एका क्लबमध्ये हिमांशु आणि त्याची पत्नी मोनाशी ओळख झाली. यादरम्यान गप्पांच्या ओघात शर्मा यांनी हिमांशुला आपल्याला हृदयविकाराचा आजार असल्याचे सांगितले. यानंतर हिमांशु आणि मोनाने त्यांना आपले गुरु मोहम्मद फैजान हे तंत्र-मंत्राच्या सहाय्याने हा आजार बरा करतील असे शर्मा यांना सांगितले.
उपचाराच्या नावाखाली खोलीत नजरकैद केले
शर्मा यांचा आरोपींच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि त्यांनी आपल्या घरचा पत्ता आरोपींना दिला. काही दिवसांनी हिमांशु, मोना, मोहम्मद फैजान, मोहम्मदची पत्नी जोहा आणि अन्य दोन तरुण शर्मा यांच्या घरी दाखल झाले. तंत्र-मंत्राच्या उपचाराच्या नावाखाली मोहम्मदने शर्मा यांना एका खोलीत नजरकैद केले. मिळालेल्या माहितीनुसार, परी चौकाजवळील एनआरआय सिटीमध्ये असलेल्या घरात संजय शर्मा यांना 1 वर्षाहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आले होते.
वर्षभरात करोडो लाटले
एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान हळूहळू 2.75 कोटी रुपये आरोपींनी आपल्या खात्यात वळते केले. यानंतर शर्मा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अमेरिकेत राहत असलेल्या आपल्या पत्नीला याची माहिती दिली. यानंतर पत्नीने ग्रेटर नोएडा पोलिसांना फोन करुन प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीच्या ताब्यातून पीडिताची सुटका केली.
पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, चेकबुक, मनोरंजन बँकेच्या नोटा आणि चार मोबाईल जप्त केले आहेत. मोहम्मद फैजान हा मुरादाबादचा रहिवासी आहे आणि स्वतःला तांत्रिक म्हणवतो. दुसऱ्या आरोपीचे नाव विशाल आहे. त्याने एमबीए केले आहे. तिसरा आरोपी हिमांशू भाटी आहे. या संपूर्ण प्रकरणात मोनी उर्फ मोना महिलेचाही सहभाग असून, ती आरोपी हिमांशू भाटीची पत्नी आहे.