सचिन तेंडुलकरकडे गार्ड म्हणून काम करणाऱ्या जवानाने संपवलं आयुष्य, जळगावमध्ये केली आत्महत्या
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील निवासस्थानी गार्ड म्हणून काम करणाऱ्या सीआरपीएफच्या जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या जामनेर येथील घरात त्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून मधून गोळी झाडून आत्महत्या केली
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील निवासस्थानी गार्ड म्हणून काम करणाऱ्या सीआरपीएफच्या जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या जामनेर येथील घरात त्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून मधून गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) मयत सीआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
प्रकाश कापडे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. कापडे मुंबई येथील सीआरपीएफच्या गोरेगाव युनिटमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कर्तव्य बजावत होते. गेल्या काही काळापासून ते प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानी गार्ड म्हणून कार्यरत होते. सचिन तेंडुलकर याच्याकडे काम करण्यापूर्वी त्यांनी मंत्री नारायण राणे, छगन भुजबळ यांच्याकडेही काम केले होते.
कापडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी , भाऊ असे कुटुंब होते. गेल्या काही दिवसांपासून कापडे हे त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी आले होते. जामनेर येथील स्वतःच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजता त्यांनी स्वतः कडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची पत्नी माहेरी गेली होती तर भाऊ गावाला गेले होते. घरी एकट्या असलेल्या प्रकाश कापडे यांनी गोळ्या झाडून आयुष्य संपवलं.
त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आसपासच्या लोकांनी तातडीने धाव घेत घराजवळ गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कापडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली ते रिव्हॉल्वर पोलिसांनी जप्त केलं . त्यामधून एक गोळी झाडून कापडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कापडे यांच्या आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.