मुंबई : जमतारा हा (Jamtara) फिशिंगचा स्कॅम तर वेब सीरीजमुळे सगळ्यांना माहीत झाला आहेच. पण त्याहीपेक्षा एक मोठा स्कॅम सध्या सुरु आहे. मुंबईत एटीएम (ATM in Mumbai) वापरणाऱ्यांना या स्कॅमचा फटका बसतोय. मुख्य म्हणजे बँकांना सलग सुट्या लागण्याच्या बरोबर आधी एटीएम कार्ड क्लोन करुन बँक खाती खाली करण्याचा गोरखधंदा काही लुटारुंनी सुरु केला आहे. सात जणांची एक गँग यामध्ये सक्रिय असल्याचा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका खासगी बँकेनं अंधेरी पोलिसात (Mumbai Crime News) तक्रारही दाखल केली आहे. तब्बल 6 लाख रुपये एकाकडी काढून घेण्यात आल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. त्यामुळे बँकेत पैसे ठेवणंही आता असुरक्षित बनलंय की काय? अशी भीती अनेकांना वाटतेय. त्यामागचं कारणही तसंच आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका खासगी बँकेच्या दोन एटीएममधून तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांचे बोगस ट्रान्झॅक्शन करण्यात आले. अंधेरी पूर्वेच्या एमआयडीसी पोलीस स्थानकात याप्रकरणी बँकेनं तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जातोय.
मरोळ इथं एका खासगी बँकेची शाखा आहे. तिथेच जवळ बँकेचं एटीएमदेखील आहे. या एटीएमबाहेर दिवसा एक सुरक्षारक्षक असतो. पण रात्री कुणीही नसतं.
ऑक्टोबर 10 रोजी करण्यात आलेल्या हिशेबात 5.50 लाख रुपयांचा काहीच ताळमेळ लागत नसल्याचं समोर आलं. त्यानंतर तसे ई-मेल बँकेच्या वरिष्ठांकडून करण्यात आले. अखेर हा सगळा संशयास्पद प्रकार उघडकीस आला.
4 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांचं एक बोगस ट्रान्झॅक्शन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. मरोळमधील एटीएममधून हे पैसे काढण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे एटीएम कार्ड क्लोन करुन भामट्यांनी हे ट्रान्झॅक्शन केलं होतं.
चकीत करणारी गोष्ट म्हणजे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तब्बल 49 ट्रान्झॅक्शन करण्यात आले. क्लोन कार्डच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल 4 लाख 90 हजार रुपये काढण्यात आले होते. तर 6 ऑक्टोबरला आणखी 7 ट्रान्झॅक्शन करण्यात आले. यावेळी 70 हजार रुपये काढण्यात आले होते.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याचं पोलिसांनी ठरवलं. पोलिसांनी 4 ऑक्टोबरपासून 6 ऑक्टोबर पर्यंतचं सीसीटीव्ह तपासलं. त्यात सहा ते सात संशयास्पद लोकं एटीएम असलेल्या ठिकाणी पैसे काढताना आढळून आलीत.
हीच लोकं चकाला येथील दुसऱ्या एका एटीममध्येही पैसे काढताना आढळली आहेत. चकालामधूनही 10 हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन क्लोन कार्डच्या मदतीने भामट्यांनी केलं होतं.
या धक्कादायक प्रकरणानंतर आता एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे. हे भामटे कोण आहेत, यांची गँग किती मोठी आहे, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे याआधीही अनेकदा लोकांच्या बँक खात्यातून अनेकदा पैसे एटीएम कार्ड क्लोन करुन लंपास करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कार्ड क्लोन करणारी ही टोळी देशभर पसरलेली असण्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. या गँगच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान सध्या मुंबई पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
क्लोन कार्डच्या वाढत्या घटना पाहता लोकांनीही एटीएम कार्ड एटीएम मशिनमध्ये वापरताना अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, असं मत जाणकार व्यक्त करतात. तसंच एटीएम मशीनची बँकांकडून सातत्यानं तपासणी होत राहणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मत लोकांनी व्यक्त केलंय.