एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक
एसबीआय बँकेचे एटीएम शोधायचे, हायटेक पद्धतीचा वापर करून रक्कम काढायची, परंतु ही रक्कम कोणाच्याही खात्यातून वजा होणार नाही, अशी व्यवस्था करायची. त्यामुळे कुणीही ग्राहक तक्रार करणार नाही, अशी होती मोडस ऑपरेंडी
नागपूर : एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे. (Nagpur Police arrested Cyber Gang from Jaipur for High-tech theft in ATM)
काय होती मोडस ऑपरेंडी?
एसबीआय बँकेचे एटीएम शोधायचे, हायटेक पद्धतीचा वापर करून रक्कम काढायची, परंतु ही रक्कम कोणाच्याही खात्यातून वजा होणार नाही, अशी व्यवस्था करायची. त्यामुळे कुणीही ग्राहक तक्रार करणार नाही, मात्र रक्कम चोरांच्या खिशात जायची, अशी पद्धत वापरत या गुन्हेगारांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागातील चार एटीएममधून पैसे काढले होते.
सुगावा कसा लागला?
चारही ठिकाणी एकाच टोळीने गंडा घातल्याचे लक्षात येऊनही पोलिसांना याचा सुगावा लागत नव्हता. मात्र एका एटीएम समोरून जात असताना त्यांची कार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि पोलिसांनी एक पथक बनवून शोध सुरु केला. ज्या एटीएमचा वापर त्यांनी पैसे काढण्यासाठी केला, ते हरियाणाच्या पल्लवल येथील असल्याचं पुढे आलं, मात्र यांची कार राजस्थान पासिंगची होती त्यामुळे पोलीस पेचात पडले. मात्र पोलिसांनी कसून तपास सुरु केला. राजस्थान आरटीओतून माहिती घेतली आणि राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने जयपूरमधून दोन आरोपींना अटक केली, तर एक जण पळून जाण्याचा यशस्वी झाला.
मोठी गँग असण्याची शक्यता
हा तपास पोलिसांसाठी कठीण होता. आरोपी हुशारीने एका शहरात चार ते पाच एटीएमला लक्ष्य करत. शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊन पुन्हा तेच काम सुरु करायचे. पोलिसांच्या मते ही गॅंग असून त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात अशा चोऱ्या केली असण्याची शक्यता आहे. पोलीस पथकाने मोठ्या सतर्कतेने काम करत राजस्थानमधून त्यांना बेड्या ठोकल्या. या कार्याबद्दल सन्मान करत आयुक्तांनी पथकाला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
संबंधित बातम्या :
इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, तरुणावर लग्नासाठी दबाव, युवती ब्लॅकमेल करत महाराष्ट्रातून राजस्थानला
हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास
(Nagpur Police arrested Cyber Gang from Jaipur for High-tech theft in ATM)