दादरमध्ये माथेफिरूचा थरार, स्टेशनवर कात्रीने तरूणीचे केसच कापले
दादर स्टेशनमध्ये माथेफिरूच्या एका कृत्यामुळे खळबळ माजली आहे. माथेफिरू इसमाने दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले
दादर स्टेशनमध्ये माथेफिरूच्या एका कृत्यामुळे खळबळ माजली आहे. माथेफिरू इसमाने दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले आणि बॅगेत भरून पळ काढला. त्या तरूणीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत तो माथेफिरू पळून गेला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत. इतर मुलींना असा त्रास होऊ नये यासाठी अशा माथेफिरूंना लवकरात लवकर पकण्यात यावे अशी मागणी तक्रारार तरूणीने केली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदार तरूणी ही कल्याणची रहिवासी असून तो माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. कॉलेजला जाण्यासाठी सोमवारी सकाळी तिने कल्याणहून 8 च्या सुमारास गाडी पकडली. 9.15 च्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली. दादरच्या ब्रीजवर ती आली असता तिकीट बुकिंग करतात त्या खिडकीजवळ पोहोचली असताना तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी टोचल्यासारेृखे, काहीतरी काटेरी वाटले.
तिने अचानक मागे वळून पाहिले असता एक अनोळखी माणूस बॅग घेऊन वेगाने चालत जाताना दिसला. तिने तेवढ्यात खाली पाहिलं असता काही केस खाली पडलेले होते. तिने तिच्या केसांवरून मागून हात फिरवला असता, तिचे केस अर्धव कापले गेल्याचे तिला आढळले. त्यामुे ती घाबरली, मात्र तरीही तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि त्या इसमाचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मात्र गर्दीचा फायदा घेत त्या माथेफिरूने तिथून पटकन पळ काढला आणि गायब झाला.
यानंतर त्या तरूणीने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली संपूर्ण घटना सांगत तक्रार दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितलं. महिला प्रवासी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेबाबत दक्षता बाळगली पाहिजे अशी मागणी केली आहे.