डिझायनर कारप्रेमींना धक्का, मुंबई पोलिसांकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दिलीप छाबरियाला बेड्या
दिलीप छाबरिया हा डिझाईन्स प्राव्हेट लिमीटेड या कंपनीचा मालक आहे. (DC Avanti Car Scam Exposed)
मुंबई : मुंबई पोलिसांनी डिझायनर कार खरेदी, विक्री आणि फायनान्स करुन लोकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज आहे. या फसवणूकच्या गुन्ह्यात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया ह्याला अटक करण्यात आली आहे. दिलीप छाबरिया हा डिझाईन्स प्राव्हेट लिमीटेड या कंपनीचा मालक आहे. (DC Avanti Car Scam Exposed)
नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी. सी. अवंती गाडी येणार आहे. या गाडीचा नंबर बोगस आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या टीमने 17 डिसेंबरला सापळा रचला. मात्र त्या दिवशी ही गाडी आली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल, कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात आला. त्यादिवशी ही अलिशान गाडी आली.
त्यानंतर पोलिसांनी ही डिझायनर कार ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ही गाडी चालवणाऱ्या मालकाची विचारपूस केली असता, त्या मालकाने गाडीचे पेपर पोलिसांना दिले. सुदैवाने हे पेपर खरे असून चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर होते. मात्र पुढील तपासात असे निदर्शनास आले की, त्याच चेसी आणि इंजन नंबरवर दुसरी गाडी हरियाणामध्ये रजिस्टर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डी. सी. अवंती गाडी ही दिलीप छाबरिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बनवण्यात आली होती. 2016 मध्ये या गाडीचे लॉन्चिंग करण्यात आलं होतं. 2015 मध्ये या गाडीला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचं क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळालं होतं. त्यानंतर या गाडीची लॉन्चिंग करण्यात आली होती. दिलीप छाबरिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 14 जून 1993 मध्ये झाली होती. पुण्यात असलेल्या दिलीप छाबरिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात डी सी अवंती कार बनवल्या जात होत्या.
यानंतर गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासामध्ये पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाची माहिती लागली. जवळपास 120 डीसी अवंती गाड्या या भारतात आणि भारताच्या बाहेर विकल्या गेल्या आहेत. या एका गाडीची किंमत अंदाजे 42 लाख रुपये आहे. एका गाडीवर एका फायनान्स कंपनीपेक्षा अधिक फायनान्स कंपन्यांकडून लोन घेण्यात आलं आहे. तसेच दिलीप छापरिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वतः बनवलेल्या गाड्या स्वतःच विकत घेतल्या आहेत. यातील 90 गाड्यांवर एकापेक्षा जास्त फायनान्स कंपनीकडून लोन घेण्यात आलं आहे.
एकीकडे हा सर्व प्रकार फसवणूक आणि आर्थिक घोटाळा आहे. पण त्यासोबतच सरकारच्या महसूलाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. कस्टम ड्युटी, जीएसटी अशाप्रकारचे अनेक कर या कंपनीकडून न भरता फसवणूक केली गेली आहे का? याचाही तपास क्राईम ब्रांचकडून केला जात आहे.
दिलीप छाबरीया यांना 28 डिसेंबरला एमआयडीसी अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना 2 जानेवारी 2021 पर्यंत पोलीस कोठड़ी सुनवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. डिजाईनर कार कंपनी, वित्तीय संस्थान आणि इतर काही विभागाचे कर्मचारी, अधिकारी हे 42 कोटीपेक्षा अधिकच्या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरच अनेकांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (DC Avanti Car Scam Exposed)
संबंधित बातम्या :
चारकोपमध्ये साई मंदिराला आग लागली नाही, लावली; हत्याप्रकरणाचा धक्कादायक उलगडा