कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात चप्पलचं एक मोठं दुकान आग लागल्याने जळून खाक झालं. मात्र, आगीनंतर 6 दिवसानी दुकानाची साफसफाई करताना दुकानात एका 11 ते 12 वर्षीय मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे (Dead body of a Child found in burned shop in Kalyan).
कल्याण पश्चिमेला स्टेशनच्या ठीक समोर राहुल शूज हे मोठे चप्पलचे दुकान आहे. या दुकानात 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने एक तासात ही आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहीती त्यावेळी फायरब्रिगेडने दिली होती. आता 6 दिवसानंतर दुकान मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दुकानातील जळालेला ढिगारा बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. साफसफाई करताना त्यांना दुकानात एका कोपऱ्यात एक 11 ते 12 वर्षीय मुलाचा जळालेला मृतदेह सापडलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.
मृतदेह 12 ते 13 वर्ष वयाच्या मुलाचा असल्याचा अंदाज
मृतदेह सापडल्यानंतर या घटनेची माहिती त्वरित महात्मा फुले पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी जेजे हॉस्पिटलला पाठवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी दिली. हा मृतदेह 12 ते 13 वर्ष वयाच्या मुलाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकणार आहे.
‘चोरट्यांची टोळी चोरी करण्यासाठी लहान मुलांचा वापर करते’
असं असलं तरी या प्रकरणावर पोलिसांनी कॅमेऱ्यावर माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत दुकान चालक महेंद्र सिंघानी म्हणाले, “दुकान जळाल्यानंतर आमचे मोठे नुकसान झाले. आम्ही चिंतेत असताना परत दुकानाची साफसफाई सुरू केली. त्यावेळी हा मुलाचा मृतदेह आढळला. नक्की हा मुलगा कोण आहे आणि तो दुकानात कसा आला ते आम्हाला माहिती नाही. एक शक्यता ही आहे की चोरट्यांची टोळी चोरी करण्यासाठी लहान मुलांचा वापर करते. या मुलाचाही उपयोग चोरीसाठी केला असावा.”
सध्या तरी या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सत्य बाहेर न आल्यानं याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता पोलीस याचा शोध घेत आहे की हा मुलगा कोण आहे आणि तो दुकानात कसा आला?
हेही वाचा :
उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग, केडीएमसी जंबो कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार
व्हिडीओ पाहा :
Dead body of a Child found in burned shop in Kalyan