एक नकार झोंबला, अन् तो नको ते करून बसला… ! बेंचपाशी सापडलेल्या त्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं
Murder Case : दिवसाढवळ्या एका तरूणीचा पार्कमध्ये मृतदेह सापडल्याने संपूर्ण शहर हादरलं. तिच्या डोक्यावर वार करून तिला संपवण्यात आलं.
Delhi Murder Case : राजधानीतील गुन्हेगारीचं (crime) प्रमाण सर्रास वाढताना दिसत आहे. असाच एक हादरवणारा गुन्हा मालवीय नगरमध्ये घडला. तेथे एका तरूणीची रॉडने मारहाण करून निर्घृण हत्या (young girl killed) करण्यात आली. तिचा मृतदेह पार्कमधील एक बेंचजवळ रक्तबंबाळ (dead body found in park) अवस्थेत पोलिसांना सापडला. तिचा गुन्हा काय तर तिने एका तरूणाला लग्नाला नकार दिला. तर त्याने सरळ तिलाच संपवलं. अतिशय बेदरकारपणे हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
नर्गिस असे मृत तरूणीचे नाव असून इरफान या आरोपीने तिला संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी महत्वाचे खुलासे केले आहेत. नर्गिस आणि इरफान यांची एकमेकांशी आधीपासूनच ओळख होती. तो तिच्याशी बोलायचाही. इरफानला नर्गिसशी लग्न करायच होतं, पण नर्गिस लग्नासाठी तयार नव्हती. याच खुन्नसमधून इरफान संपूर्ण प्लॅनिंग करून रॉड घेऊन आला आणि नर्गिस पार्कमध्ये आल्यावर तिच्यावर भीषण हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफानचे कुटुंब दिल्लीतील संगम विहार भागात राहते. नर्गिस पूर्वी इरफानशी बोलायची, पण अलीकडच्या काळात नर्गिस इरफानचा फोन उचलत नव्हती. याचा इरफानला राग आला होता. आज सकाळी नर्गिस एका मैत्रिणीसोबत पार्कमध्ये आली होती. त्याचवेळी त्याने हा हल्ला करून तिला संपवलं. तरूण मुलगी गमावल्यामुळे तिच्या कुटुबियांची रडून वाईट अवस्था झाली आहे.
याच वर्षी ग्रॅज्युएशन केलं होतं पूर्ण
नर्गिस ही कमला नेहरू कॉलेजची विद्यार्थिनी होती. या वर्षी तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि तिला सरकारी नोकरी करायची होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्गिसला स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं. तिला स्टेनो व्हायचं होतं. यासाठी ती मालवीय नगर परिसरात कोचिंग क्लासलाही जात होती. पण एका नकाराने तिचं आयुष्य संपलं. पोलिसांनी नर्गिसचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.