लाइक्स आणि फॉलोअर्सचा नाद ठरतोय जीवघेणा, मुंबई, कानपूर ते चंद्रपूरपर्यंत 72 तासात 8 जणांचा चटका लावणारा मृत्यू
सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळावेत यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. या नादात ते अनेकवेळेस एखाद्या अपघाताचे बळी ठरतात तर काही वेळा लोकांना जीवही गमवावा लागतो. गेल्या काही दिवसांत अशीच प्रकरणे समोर आली आहेत.
सोशल मीडियावरील लाइक्सची (likes of social media) भूक आता अतिशय जीवघेणी ठरत आहे. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी (to increase followers) अनेक लोक आपला जीव धोक्यात घालायलाही पुढे मागे पहात नाहीत. गेल्या तीन दिवसांतही निष्काळजीपणाच्या अशा 4 घटना घडल्याचे समोर आले असून त्यामध्ये 8 लोकांना नाहक त्यांचा जीव गमवावा लागला.
फक्त लहान मुलं आणि तरूणाईच नव्हे तर मोठ्या वयाची माणसेही असा निष्काळजीपणा करताना दिसत आहे. देशातील अनेक भागात अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईत अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. तेथे दोन मुलांचे आई-वडील समुद्रा फोटो काढण्यासाठी डेंजर झोनमध्ये गेले. मात्र तेवढ्यात आलेल्या एका जोरदार लाटेमुळे दोघेही पाण्यात पडले. महिलेच्या पतीची जीव तर कसातरी वाचला पण, या दुर्दैवा अपघातात त्या महिलेला नाहक जीव गमवावा लागला.
इन्स्टाग्राम रील बनवताना झाला मृत्यू
गावी आलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप दुसऱ्याचा शोध सुरू आहे. दोघेही नदीत उतरून इन्स्टाग्राम रील बनवत होते. हे दोघेही दिल्लीतील बदरपूर येथील रहिवासी होते. त्यांच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, मोठा मुलगा रेहान 17 वर्षांचा होता. तर धाकटा चांद 13 वर्षांचा होता. नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असतानाही त्याती पर्वा न करता ते इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र शूटिंग करतानाचा अचानक रेहानचा पाय घसरला व तो बुडू लागला. चांदने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तोही हुडून लागला. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी चार मुले होती, मात्र कोणीही त्यांना वाचवू शकले नाही.
नदीत उतरलेला इसम झाला गायब
कानपूरमध्ये अंश नावाचा तरुण इन्स्टाग्रामवर रील बनवताना नदीच्या पाण्यात वाहून गेला. त्याचे 4 साथीदार त्याच्या समोर उभे होते, मात्र त्यापैकी कोणीच त्याला वाचवू शकलं नाही. हे पाचही तरूण पांडू नदीच्या काठी इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी गेले होते. तेवढ्यात अंशने नदीत उडी मारली आणि तो गायबच झाला.
मुंबईत महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू
पत्नी ज्योती (32) आणि दोन मुलांसह पिकनिकसाठी आलेल्या मुकेश (35) यांना समुद्रात जाणं फारचं महाग पडलं. मुकेश व ज्योती फोटो काढण्यसाठी समुद्रात मध्यभागी असलेल्या खडकाववर बसले होते, मात्र तेवढ्यात आलेल्या लाटेच्या जोरदार तडाख्यामुळे तो दोघेही पाण्यात पडले. पत्नीला वाचवण्यासाठी मुकेशने तिची साडी घट्ट पकडून ठेवली, मात्र त्याचा हात सुटल्याने पत्नी समुद्रात वाहून गेली. बऱ्याच काळाच्या शोधमोहिमेनंतर ज्योतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सेल्फीच्या मोहाने एक हसतखेळतं कुटुंब क्षणात उध्वस्त झालं.
सेल्फीच्या नादात चौघांचा मृत्यू
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सेल्फी काढताना तलावात बुडून ४ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडझरी तलावात ही दुर्दैवी घटना घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 तरुण पावसाचा आनंद लुटण्यासाठी घोडझरी तलावाजवळ गेले होते. यातील एक तरुण तलावाच्या काठावर सेल्फी घेऊ लागला. मात्र अचानक त्याचा पाय घसरल्याने तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तीन मित्रांनीही पाण्यात उडी मारली, मात्र ते तिघेही बुडू लागले. या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच पोलिस व आपत्ती निवारण पथकातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बुडालेल्या तरूणांचा शोध घेणे सुरू आहे.