बनावट कागदपत्रांद्वारे विवाह प्रमाणपत्र, मग तरुणीची नाहक बदनामी, काय आहे प्रकरण?
लग्नाला नकार दिला म्हणून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनवून तरुणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सांगली : बनावट कागदपत्रांद्वारे विवाह प्रमाणपत्र बनवून तरुणीची बदनामी केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी 11 जणांवर आष्टा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीने तरुणीच्या शाळेतून माझे बोनाफाईड प्रमाणपत्र, फोटो उपलब्ध करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र बनवल्याचा तरुणीचा आरोप आहे. सदर तरुण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून ‘तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देखील तरुणीला दिल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणी वाळवा ग्रामपंचायतमध्ये देखील हलगर्जीपणा करून अप्रत्यक्षरीत्या आरोपीस मदत केल्याचे दिसून येते. तेथील संबंधितावर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे.
एकूण 11 जणांवर गुन्हे दाखल
सदर तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर तरुणीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी बनावट विवाह प्रमाणपत्र बनवणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र बनवण्यास अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या शाळा आणि वाळवा ग्रामपंचायतमधील अशा एकूण 11 जणांवर आष्टा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनुसार तत्काळ आरोपीवर गुन्हा दाखल केला. पाठलाग करून विनयभंग करणे, लग्न करण्याचा तगादा लावणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह नोंदणी करून विवाह प्रमाणपत्र मिळवणे, मुलीच्या नातेवाईकांना अडवून धमकवणे या सदराखाली गुन्हा दाखल केलेला असून मुख्य आरोपीस अटक केली आहे.
मुख्य आरोपी सराईच गुन्हेगार
तसेच सदर आरोपींना मदत करणाऱ्या एकूण इतर 10 आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच मुख्य आरोपीवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा केलेली आहे. पण तक्रार केल्यानंतर तौसिफ शेखला अटक झाली आणि त्याला जामीनही मिळाला आहे. पण तो तरुणीच्या घरासमोरुन अजूनही फिरतो. मला कॉलेजला जाणेही अवघड होत आहे. तौसिफ शेख आहे गुन्हेगार असून, एका खुनाच्या केसमध्ये तो जेलमध्ये देखील जाऊन आला आहे. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे माझी कॉलेजमध्ये लग्न झाल्याची चुकीची बदनामी झाले तसेच मला लग्नासाठी आता येणारी स्थळे पण येत नाहीत असा देखील तरुणीने आरोप केला आहे.