केजरीवालांच्या कन्येची 34 हजारांना फसवणूक, तिघांना अटक, मास्टरमाईंड परागंदा
25 वर्षीय हर्षिता केजरीवालने घरातील जुना सोफा विकण्यासाठी एका वेब पोर्टलवर जाहिरात दिली होती. (Arvind Kejriwal Daughter online fraud)
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीला ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑनलाईन सोफा विक्री करताना हर्षिता केजरीवालची 34 हजारांना फसवणूक झाली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे, तर मास्टरमाईंड अद्यापही फरार आहे. (Delhi CM Arvind Kejriwal Daughter Harshita online fraud Three Accuse Arrested)
कपिल, मानवेंद्र आणि साजिद या तिघांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कपिल आणि मानवेंद्र उत्तर प्रदेशातील मथुरेचे रहिवासी आहेत, तर साजिद हा मेवातला राहतो. कपिलचे HDFC बँकेत खाते होते. या प्रकरणाचा मास्टरमाईंड अद्यापही परागंदा आहे. पोलिस तिघा आरोपींची चौकशी करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
फसवणूक नेमकी कशी झाली?
25 वर्षीय हर्षिता केजरीवालने घरातील जुना सोफा विकण्यासाठी एका वेब पोर्टलवर जाहिरात दिली होती. आरोपींनी ग्राहक असल्याचं भासवून सोफा विकत घेण्यासाठी हर्षिताला अप्रोचे केले. हर्षितासोबत झालेल्या बोलणीनंतर त्यांनी सोफा विकत घेण्याचं निश्चित केलं. सोफ्याचे पैसे पाठवण्यासाठी आरोपींनी आधी हर्षिताच्या बँक खात्यावर काही रक्कम पाठवली. हर्षिताने ते पैसे मिळाल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी तिला एक बारकोड स्कॅन करायला सांगितलं. हा बार कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच हर्षिताच्या बँक खात्यावरुन 20 हजार रुपये वजा झाले.
बारकोड स्कॅनिंगच्या पद्धतीने गंडा
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हर्षिताने संबंधितांना याबाबत जाब विचारला. मात्र, आरोपींनी चुकून वेगळा बारकोड पाठवल्याची सारवासारव केली. तसेच नवा बारकोड स्कॅन केल्यास हे पैसे परत येतील, असंही सांगितलं. यावर विश्वास ठेवून हर्षिताने पुन्हा एकदा नवा बारकोड स्कॅन केला. तेव्हा पुन्हा तिच्या बँक खात्यातून 14 हजार रुपये वजा झाले. त्यानंतर हर्षिताला आपण पूर्णपणे फसवलो गेल्याची जाणीव झाली. यानंतर तिने तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली.
हेही वाचा :
ऑनलाईन शॉपिंग करताय, मग सावधान, मुंबई पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सची यादी जाहीर
बारकोड स्कॅन करायला सांगत गंडा, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मुलीची 34 हजार रुपयांची फसवणूक
(Delhi CM Arvind Kejriwal Daughter Harshita online fraud Three Accuse Arrested)