Gopal Kanda Haryana ex MLA News : गीतिका शर्मा मृत्यू प्रकरण, हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता
देशभर गाजलेल्या गितिका शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम निर्णय सुनावला आहे.
दिल्ली / 25 जुलै 2023 : देशातील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा आणि त्यांचे सहकारी अरुण चड्ढा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने कांडा यांची निर्दोष मुक्तता केली. गोपाल कांडा यांच्या एमएलडीआर एअरलाइन्समध्ये गीतिका शर्मा एअरहॉस्टेस होती. मग तिला कंपनीची संचालिका म्हणून पदोन्नतीही मिळाली होती. दिल्लीतील अशोक विहार येथे 5 ऑगस्ट 2012 रोजी गीतिका राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. यावेळी गितिकाच्या घरात आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे गोपाल कांडा आणि त्यांच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर दिल्ली न्यायालयात हा खटला सुरु होता.
कांडा यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप होता
गोपाल कांडा हे काँग्रेसचे भूपिंदर सिंग हुड्डा सरकारमध्ये मंत्री आणि व्यावसायिक होते. मात्र कांडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्रिपदावरुन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. गितिकाने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये तिने गोपाल कांडा आणि अरुण चड्ढा आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते.
काय म्हटले सुसाईड नोटमध्ये?
गीतिकाने मृत्यूपूर्वी दोन पानी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने गोपाल कांडा आणि अरुणा चढ्ढा यांच्यावर आरोप केले होते. ‘मी आतून तुटली आहे, म्हणून मी स्वतःला संपवत आहे. माझा विश्वासघात झाला. गोपाल कांडा आणि अरुणा अरुणा चढ्ढा हे दोघे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. दोघांनी माझा विश्वास तोडला आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझा वापर केला. या लोकांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता हे लोक माझ्या कुटुंबाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांनाही या चुकीची शिक्षा झाली पाहिजे’, असे गितिकाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.
गोपाल कांडा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 201 (पुरावा नष्ट करणे), 120B (गुन्हेगारी कट) आणि 466 (बनावट) यासह विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. एका ट्रायल कोर्टाने त्यांच्यावर बलात्कार (376) आणि 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध)चे ही आरोप निश्चित केले होते, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ते रद्द केले.