Delhi Murder | नोकरी गेल्यावरुन वाद, प्रेयसीने केलं ब्रेकअप, प्रियकराकडून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय आरोपी हरीश हा मेहरौली येथील वॉर्ड क्रमांक-1 येथील रहिवासी आहे. तर 19 वर्षीय मयत प्रेयसी बिना ही खानापूर येथील दुर्गा विहार येथील रहिवासी होती
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Delhi Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेहरौलीतील भूल भुलैया भागात ही घटना घडली आहे. दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला होता. यावेळी प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने अनेक वेळा वार (Girlfriend Attacked) केले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमी तरुणीला एम्समध्ये नेले, मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वर्षभरापासून प्रियकराला नोकरी नव्हती आणि कामही मिळत नव्हते. यावरुनं दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. सहा दिवसांपूर्वी प्रेयसी त्याला सोडून आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली होती, त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने तिला भेटायला बोलवून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय आरोपी हरीश हा मेहरौली येथील वॉर्ड क्रमांक-1 येथील रहिवासी आहे. तर 19 वर्षीय मयत प्रेयसी बिना ही खानापूर येथील दुर्गा विहार येथील रहिवासी होती. चौकशीत आरोपीने सांगितले की, दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या दोन महिन्यांपासून आया नगरमध्ये एकत्र राहत होते.
आरोपी प्रियकराने सांगितले की तो ऑटो दुरुस्तीचे काम करत असे. मात्र गेल्या एक वर्षापासून त्याची नोकरी गेली असून त्याला काम मिळत नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
सहा दिवसांपूर्वी संबंध तोडले
6 दिवसांपूर्वी बिनाचे हरीशसोबत पुन्हा भांडण झाले होते. त्यानंतर तिने हरीशशी संबंध तोडले आणि ती पुन्हा तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. याचा हरीशला खूप राग आला. त्याने भूलभुलैया परिसरात बिनाला शेवटचे भेटायला बोलावले. बिनानेही होकार दिला. सोमवारी सायंकाळी 5 वाजता दोघे तिथे भेटले असता, काही कारणावरून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. हरीश आधीच चिडला होता. बिना तिथून निघू लागताच हरीशने तिच्या मानेवर चाकूने वार केले. बिना रक्तबंबाळ होऊन तिथेच पडली. पोलिसांनी आरोपी हरीशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.