नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोन महिन्यांच्या शोधानंतर मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO- ग्रेड II) कैलाश कुमार लाल दास आरोपी असून तो सब-इन्स्पेक्टरच्या (Sub Inspector) दर्जाचा अधिकारी आहे. आरके पुरम येथील रहिवासी असलेल्या दासने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तो पीडितेच्या वडिलांचा गेल्या सहा-सात वर्षांपासून मित्र आहे. त्यामुळे तो वारंवार त्यांच्या घरी जात येत असे.
मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदावर काम करणाऱ्या कैलाश कुमार लाल दासने आपल्या मित्राला वचन दिले होते की त्याच्या मुलीला योग्य नोकरी मिळवून देण्यास मदत करेल.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिला सात मार्च रोजी मोतीबाग मेट्रो स्टेशनजवळ दासपाशी सोडले. त्यानंतर, आरोपीने अल्पवयीन मुलीला मध्य दिल्लीतील करोल बाग येथील हॉटेलमध्ये नेले, जिथे त्याने तिला कथितरित्या धमकावून तिच्यावर बलात्कार केला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पीडितेने तिच्या आई-वडिलांना फोन करुन आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर करोलबाग पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन महिन्यांच्या शोधानंतर आरोपी दासला अटक करण्यात आली.