Dead Body in Oven | सव्वा महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह ओव्हनमध्ये, जन्मदात्रीवरच संशय
चिमुकलीची आई डिम्पल कौशिक हिने ही हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आजीने केला आहे. दुपारी चार वाजल्यापासून मुलीचा शोध सुरू होता आणि सुमारे पाऊण तासानंतर खोलीत ठेवलेल्या ओव्हनमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली : सव्वा महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या (Baby Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील (Delhi Crime) चिराग दिल्ली गावात उघडकीस आली आहे. एक महिना वीस दिवसांच्या मुलीचा मृतदेह ओव्हनमध्ये (Oven) आढळला. बाळाचा मृतदेह कापडात गुंडाळलेला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा चेहरा निळा पडला होता, तर तिच्या तोंडातून रक्त येत होतं. मुलीच्या आईनेच तिची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत बाळाच्या आजीनेच आपल्या सुनेवर खुनाचा आरोप केला आहे. पोलीस सध्या महिलेची चौकशी करत आहेत.
सध्या पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आई आणि वडिलांची चौकशी सुरु आहे. लवकरच या प्रकरणाचे गूढ उलगडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. चिमुकलीची आई डिम्पल कौशिक हिने ही हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आजीने केला आहे.
बाळाला भेटण्यासाठी आजीचा धोशा
मुलीच्या आजीची रडून रडून बिकट अवस्था झाली असून सतत तिला नातीची आठवण येत आहे. घटनेच्या दिवशी सकाळीच बाळाची आजी खातू श्याम येथून दर्शन घेऊन परतली होती. नातीला नजर लागू नये म्हणून तिने अंगारा आणला होता. नातीला पाहण्यासाठी ती तळमळत होती आणि सकाळपासून ती बाळाची विचारपूस करत होती, पण तिच्या सुनेने प्रत्येक वेळी तिचं बोलणं टाळलं.
घरात बाळाचा शोध
सायंकाळी चार वाजताच्या सुमारास चहा घेण्याची वेळ झाल्यावर आजीने पुन्हा एकदा मुलीबाबत विचारणा केली. मुलीचे काका तिला शोधण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेले असता दोन्ही खोल्यांचे दरवाजे बंद होते. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी आरडाओरडा सुरू झाला. मुलीची आई डिंपल पहिल्या मजल्यावरील एका खोलीतच होती, मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व जण मुलीचा शोध घेऊ लागले होते.
बाळाच्या आईचं बेशुद्ध पडल्याचं नाटक?
शोधाशोध सुरु असताना मुलीची आई ज्या खोलीत होती, त्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी मुलीची आई बेशुद्धावस्थेत होती, असं प्रत्यक्षदर्शी प्रतीक भारद्वाज याने सांगितले. जेव्हा महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी स्पिरीटची चाचणी करताच तिला शुद्ध आली. त्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचे नाटक करत असल्याचे बोलले जात होते.
ओव्हनमध्ये मुलीचा मृतदेह
मुलीचा शोध घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर असलेल्या दुसऱ्या खोलीच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या, मात्र त्या खोलीतही मुलगी सापडत नव्हती. यानंतर दुसऱ्या मजल्यावरही मुलीचा शोध घेण्यात आला. वॉशिंग मशिनमध्येही तिचा शोध घेतला गेला. तेवढ्यात एका खोलीत ओव्हन दिसला. तो वजनाने जड लागत होता. तो उघडून पाहिला असता मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळलेला आढळला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. दुपारी चार वाजल्यापासून मुलीचा शोध सुरू होता आणि सुमारे पाऊण तासानंतर खोलीत ठेवलेल्या ओव्हनमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
सध्या पोलीस मुलीची आई डिंपल आणि वडील गुल्लू कौशिक यांची चौकशी करत आहेत. ज्या खोलीत मुलीचा मृतदेह ओव्हनमध्ये आढळला, त्या खोलीला पोलिसांनी सील केले आहे.
मुलीची हत्या कशी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण मुलीच्या आईवरच संशय व्यक्त केला जात आहे. मुलीची हत्या का झाली? या प्रश्नाचं उत्तर सध्या कोणाकडे नाही. मुलीला एक मोठा भाऊ देखील आहे. त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटीही ही हत्या झाल्याची शक्यता कमी आहे.
संबंधित बातम्या :
किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं
आठवडाभर बेपत्ता, चिमुकलीचा मृतदेह घरात पाण्याच्या टाकीत सापडला, तिघे नातेवाईक ताब्यात
चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘वैरीण माते’ने हत्येची कारणं सांगितली